फुटबॉल लीजंट पेले यांची प्रकृती गंभीर

फुटबॉल जगतात ब्राझीलला तीन वेळा वर्ल्ड कप जिंकून देणारे शतकातील महान खेळाडू पेले यांची प्रकृती गंभीर बनली आहे. पेले गेले काही दिवस कॅन्सरने आजारी आहेत. नियमित चेकअप साठी ते रुग्णालयात गेले तेव्हा त्यांना तेथेच दाखल करून घेतले गेले आहे. पेले यांनी नाताळ, रुग्णालयातच मुलगी, मुलगा आणि परिवारासमवेत साजरा केला असून त्यांचे अन्य नातेवाईक सुद्धा हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत. ८२ वर्षीय पेले डॉक्टरांच्या विशेष निगराणी खाली असून त्यांचा मुलगा एडीन्हो आणि मुलगी केली यांनी इन्स्टाग्रामवर वडिलांसोबत फोटो शेअर करून इमोशनल पोस्ट केल्या आहेत.

शनिवारी पेले यांचा मुलगा एड्सन चोल्बी उर्फ एडीन्हो याने सोशल मिडीयावर वडिलांच्या फोटोसोबत ‘पापा तुम्ही माझी ताकद आहात’ अश्या भावना शेअर केल्या आहेत तर मुलगी केली हिने रविवारी नाताळ दिवशी, वडिलांचा फोटो शेअर करून,’ कृताज्ञता, प्रेम, कुटुंबाची साथ हेच नाताळचे सार. या मजेदार आणि अद्भुत जीवनात मी त्यांच्याशिवाय कुणीच असू शकले नसते, नाताळ शुभेच्छा’ असे म्हटले आहे.

पेले यांना सप्टेंबर २०२१ मध्ये आतड्याचा कर्करोग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर आवश्यक ते सारे उपचार सुरु असून ते नियमित तपासणीसाठी हॉस्पिटल मध्ये जात होते. पेले यांनी ब्राझीलसाठी तीन वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला असून १९५८,६२,७० अशी ही तीन वर्षे आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १३६३ सामने खेळले असून १२८१ गोल केले आहेत. ब्राझील साठी ९१ सामन्यातून त्यांनी ७७ गोल केले आहेत.