भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात

सातारा जिल्यातील माण मतदारसंघाचे आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या फॉरच्युनर गाडीला शनिवारी पहाटे साडेतीन वाजता झालेल्या अपघातात गोरे यांच्यासह गाडीतील अन्य चार जण जखमी झाले आहेत. गोरे यांच्या छातीला मार लागल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात हलविले गेले आहे. अन्य दोघांवर बारामती येथे उपचार सुरु असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी ३० फुट खोल खड्ड्यात कोसळली. गोरे पुण्याहून दहिवडी कडे जात असताना फलटण जवळ मलठाण जवळ हा अपघात झाला असल्याचे समजते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पहाटेची वेळ असल्याने चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. गोरे माण मतदारसंघातून २००९,२०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. यामुळेच फडणवीस यांनी त्यांना सातारा जिल्हाध्यक्ष बनवून त्यांचे राजकीय बळ वाढविल्याचे बोलले जाते. सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड मानला जातो.

एकनाथ शिंदे गटाचे ४० आमदार उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड करून महाविकास आघाडीतून बाहेर पडले तेव्हा प्रथम जयकुमार गोरे यांनीच भाजपबरोबर त्यांनी सरकार स्थापन करावे असे मत व्यक्त केले होते. एका खासगी वहिनीला मुलाखत देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या धोक्याचा हिशोब आता पूर्ण होईल असेही म्हटले होते.