अमेरिकेत ‘बॉम्ब’ तुफानाचा कहर, बर्फवृष्टी आणि अतिथंडीने व्यवहार ठप्प

नाताळ आणि नववर्ष सुट्ट्या असल्याने प्रवासाचे बेत आखलेल्या अमेरिकेतील नागरिकांना भीषण बॉम्ब वादळ आणि प्रचंड हिमवर्षावाला तोंड द्यावे लागत आहे. देशाच्या मोठ्या भागात वादळाच्या धोका असून न्यूयॉर्क सह अनेक ठिकाणी आणीबाणी जाहीर केली गेली आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात अनेक ठिकाणी उणे तापमान असून हिमवादळामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य झालेले नाही. हवामान विभागाने थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. १४ लाख घरांवर वीज संकट आले असून अनेक भाग अंधारात बुडाले आहेत.

देशातील सर्वात मोठी वीज कंपनी टेनेसी व्हॅली अॅथोरिटीने शुक्रवारी बऱ्याच भागात वीज संकट निवारले गेल्याचे सांगितले असले तरी वीज जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. हाडे फोडणारी थंडी आणि बर्फवादळामुळे सुमारे ५००० विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. ही परिस्थिती लवकर पूर्वपदावर येण्याची कोणतीही शक्यता नाही असे समजते. अमेरीकेच्या एका सीमेवरून दुसऱ्या सीमेपर्यंत हिमवादळ असल्याने शेजारी कॅनडा देशातील विमान उड्डाणे प्रभावित झाली आहेत. वेस्ट जेटने टोरांटो वरून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली आहेत.

मेक्सिको सीमेवर शेकडो स्थलांतरित थंडीने गारठले आहेत. अमेरिकेत त्यांना प्रवेश मिळणार का याचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. करोना मुळे २०२० पासून मेक्सिकोतून अमेरिकेत येण्यास बंदी घातली गेली होती.