मेस्सीने बीसीसीआय सचिव जय शहा यांना दिले मस्त गिफ्ट

फिफा वर्ल्ड कप २०२२ आर्जेन्टिनाला जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावलेला कप्तान लियोनेल मेस्सी यांच्या चाहत्यांची संख्या जगभरात वाढल्यास नवल नाही. मेस्सी च्या चाहत्यांमध्ये अनेक सेलेब्रिटी आणि काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत. भारतात सुद्धा मेसीची लोकप्रियता मोठी आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा हे सुद्धा मेस्सीचे चाहते आहेत. आणि विशेष म्हणजे मेस्सी कडून त्यांना एक मस्त गिफ्ट दिले गेले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा यांनी सोशल मिडीयावर या संदर्भातला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मेस्सीने त्यांची सही असलेली जर्सी जय शहा यांना गिफ्ट केल्याचे कॅप्शन मध्ये म्हटले आहे. ओझा म्हणतात, ‘गोटने जयभाईना धन्यवाद देऊन सहीसह जर्सी पाठविली आहे. माझ्यासाठी सुद्धा अशीच भेट लवकर येईल अशी आशा करतो.’

जय शहा यांनी आर्जेन्टिनाने फिफा वर्ल्ड कप जिंकल्यावर मेस्सीच्या संघाला शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले होते. त्यात शहा यांनी फुटबॉल हा अविश्वसनीय खेळ असून दोन्ही टीम फारच छान खेळल्याचे म्हटले होते आणि आर्जेन्टिनाने तिसऱ्या वेळी वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.