आयपीएल लिलाव इतिहासात करेन नाही, तर मॉरीस आहे सर्वात महाग खेळाडू

आयपीएल २०२२ चे लिलाव नुकतेच झाले असून त्यात अनेक खेळाडूंचे नशीब चमकले आहे. सॅम करेन हा इंग्लंडचा ऑलराउंडर खेळाडू सर्वात महाग ठरला असून त्याने सर्वाधिक बोलीचे रेकॉर्ड नोंदविले आहे. पंजाब किंग्स इलेव्हनने त्याला १८.५० कोटी रुपयात खरेदी केले आहे आणि आयपीएल इतिहासात तो सर्वात महाग खेळाडू ठरल्याचे म्हटले जात आहे. मात्र तांत्रिक दृष्टया पहिले तर करेन सर्वात महाग खेळाडू नाही तर गतवर्षी १६.२५ कोटी मध्ये विकला गेलेला क्रिस मॉरीस याने आयपीएल इतिहासात सर्वाधिक महाग खेळाडू असल्याचे रेकॉर्ड नोंदविले असे म्हणावे लागते.

१८.५० कोटी पेक्षा १६.२५ कोटी मोठे कसे अशा प्रश्न पडला असले तर त्यासाठी रुपयाचे गणित समजून घेणे भाग आहे. मॉरीसला राजस्थान रॉयल्सने २०२१ मध्ये १६.२५ कोटी मध्ये खरेदी केले होते. विदेशी खेळाडूना बोली म्हणून मिळालेली रक्कम भारतीय करन्सी मध्ये वापरता येत नाही. त्यांना ही रक्कम डॉलर्स मध्ये बदलून घ्यावी लागते. २०२१ मध्ये जेव्हा आयपीएल बोली लागली तेव्हा गुरुवारी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी डॉलरचा विनिमय दर ७२.६१ रुपये होता. तर २३ डिसेंबर २०२२ रोजी हाच दर रुपया घसरल्याने ८२.८१ वर गेला आहे. म्हणजे हिशोब केला तर आजच्या रेटने करेन याला २२,३४,०२९. ७० डॉलर्स मिळणार आहेत.

क्रिस मॉरीसच्या त्यावेळच्या दराने हिशोब केला तर १६.२५ कोटी रुपयांचे २२,३७,८६९.७१ डॉलर्स होतात. म्हणजे क्रिसला साधारण चार हजार डॉलर्स जास्त मिळाले आहेत.