बुलेट ट्रेनची ट्रायल रन २०२६ मध्ये होणार

भारत जपान सहकार्याने देशात धावणाऱ्या पहिल्या बुलेट ट्रेनची ट्रायल रन जून २०२६ मध्ये होईल आणि २०२७ मध्ये सर्व काम पूर्ण होऊन देशात बुलेट ट्रेन धावू लागेल असे नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र प्रसाद यांनी जाहीर केले आहे. सुरत ते बिलीमोरा हे २२० किमी अंतराचे पायलिंग पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

देशात २०१४ साली प्रथम मोदी सरकार आले आणि तेव्हापासून बुलेट ट्रेनची चर्चा सुरु झाली. अहमदाबाद आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई या दरम्यान पहिली बुलेट ट्रेन धावणार हे निश्चित झाले आणि प्रत्यक्ष कामाची सुरवात २०१७ मध्ये झाली. त्यात वेळोवेळी अनेक अडथळे आले. आता मात्र हे काम चोवीस तास आणि अतिशय वेगाने पूर्ण केले जात आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्ट साठी लागणारे अनेक सुटे भाग देशातच बनविले गेले आहेत. देशासाठी ही गाडी अभिमानाची बाब मानली जात आहे.

राजेंद्र प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने या साठी चांगले सहकार्य केले असून जमीन अधिग्रहणाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. टेंडर काढली गेली आहेत. आणि लवकरच महाराष्ट्रात सिविल इन्जिनीअरिंगचे काम सुरु होत आहे. जपानने या कामी सहकार्याचा हात दिला आहे. जपानच्या शिन्क्सेन बुलेट ट्रेनचा मृत्युदर शून्य असून सुरक्षा रेकॉर्ड उत्तर दर्जाचे आहे. आपले इंजिनिअर्स जपान मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. जपानने या प्रकल्पासाठी ८८ हजार कोटीचे सॉफ्ट लोन दिले असून पुढील ५० वर्षात त्याची परतफेड ०.१ व्याज दराने करायची आहे.