केरळ – दारू विक्री रेकॉर्ड बरोबरच सर्वाधिक सोने वापरणारे राज्य

फिफा वर्ल्ड कप २०२२ च्या विजयाचा जल्लोष भारतात केरळ राज्यात सर्वाधिक झाला आणि एका दिवसात ५६ कोटींच्या दारू विक्रीचे रेकॉर्ड केरळने नोंदविले अशी बातमी नुकतीच आली होती. पण केरळ राज्याची इतकीच खासियत नाही. भारतात सर्वाधिक सोन्याचा वापर करणारे राज्य अशी केरळची ओळख आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे अतिशय मनोहर राज्य स्वतःला ‘गॉडस ओन कंट्री’ म्हणजे देवाचे राज्य म्हणवून घेते. ४४ नद्या आणि प्रचंड बॅकवॉटर्स, उंच निळे पहाड, सुंदर शांत समुद्रकिनारे, नारळीची बने, वन्यजीव, वनौषधी,, थंड हवेची ठिकाणे, वैशिष्टपूर्ण उत्सव, असंख्य मंदिरे केवळ देशातीलच नाही तर विदेशी पर्यटकांना केरळ कडे आकर्षित होण्यास भाग पाडतात.

राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षणानुसार केरळ भारतातील सर्वात स्वच्छ राज्य आहे. येथील खेडोपाड्यात सुद्धा हॉस्पिटल्स आणि बँका आहे. साक्षरतेचे प्रमाण देशात सर्वाधिक आहेच पण विशेष म्हणजे येथे पुरुष आणि महिला प्रमाण लक्षात घेतले तर महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा ०.०९ टक्के जास्त असल्याचे दिसते.

देशातील सर्वात श्रीमंत हिंदू देवस्थान केरळ मधील पद्मनाभ मंदिर आहे. केरळ मध्ये सोन्याचा वापर आणि खप दोन्हीही खूप आहे. येथे विवाहात वधूला किलोने सोने देण्याची पद्धत आहे. त्यामुळे येथील शहरात अतिभव्य म्हणता येतील अशी सराफ दुकाने आहेत. येथील रेशीम उच्च दर्जाचे मानले जाते. केरळ मधील फार मोठी प्रजा खाडी देशात नोकरी निमित्ताने वास्तव्य करते. पर्यटकाच्या साठी केरळ लोकप्रिय पर्यटन स्थळ असून येथे वर्षभर पर्यटक येत असतात. भारतात मान्सून चा पाउस फार महत्वाचा मानला जातो आणि दरवर्षी केरळ मध्ये मान्सून कधी येणार याची प्रतीक्षा हवामान तज्ञ करतात आणि त्यावरून देशातील मान्सून स्थितीचा अंदाज दिला जातो.