स्पॅम मेल मुळे बीसीसीआय हैराण

बीसीसीआयने सिनियर टीम राष्ट्रीय निवड कमिटी निवडीची प्रोसेस सुरु केली असतानाचा संस्थेच्या ई मेल बॉक्स मध्ये आलेल्या स्पॅम मेल मुळे बीसीसीआय अधिकारी हैराण झाले आहेत. कमिटी निवडीसाठी आलेल्या ६०० अर्जात मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर, कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग यांचे अर्ज आहेतच पण पाकिस्तानचा  निवड समितीचा माजी मुख्य सदस्य आणि माजी कप्तान इंजमाम उल हक याचाही अर्ज आला आहे. अर्थातच हे सर्व अर्ज बनावट आहेत आणि बनावट अॅड्रेसवरून पाठविले गेले आहेत.

बीसीसीआयच्या निवड समिती मध्ये मुख्य सिलेक्टर सह अन्य चार सदस्य असणार आहेत. आलेल्या अर्जातून १० नावे शॉर्ट लिस्ट केली जाणार असून त्यातून पुढे पाच नावे निवडली जाणार आहेत. बीसीसीआय अधिकारी म्हणाले, ही प्रक्रिया सोपी नाही. त्यातच स्पॅम मेल मुळे खूप वेळ वाया जात आहे. शॉर्ट लिस्ट केलेल्या १० नावांमधून पाच नावांची निवड सीएसीचे तीन सदस्य अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नायक हे करणार आहेत.

निवड समितीचा कार्यकाल साधारण चार वर्षे असतो. मागील निवड समिती मध्ये चेतन शर्मा मुख्य सिलेक्टर होते आणि हरविंदरसिंग, सुनील जोशी,देवाशिष मोहंती हे अन्य सदस्य होते. मात्र गेल्या महिन्यात टी २० मध्ये पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने पूर्ण समिती बरखास्त केली. श्रीलंका आणि न्यूझीलंड होम सिरीज पूर्वी नव्या संघाची निवड केली जाणार आहे. २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि २०२४ मध्ये टी २० वेस्ट इंडीज मध्ये होणार आहे.