लग्नासाठी मुलगी द्या- इच्छुक नवरदेवाचा अनोखा मोर्चा

सोलापूर मध्ये बुधवारी एक अनोखा मोर्चा काढण्यात आला. त्यात इच्छुक नवरदेव पूर्ण विवाह पोशाखात घोड्यावरून आले आणि वाजत गाजत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. महाराष्ट्रात जेन्डर रेशो म्हणजे मुलगा आणि मुलगी प्रमाण व्यस्त असल्याने मुलींची संख्या कमी आहे आणि याला सरकार कारणीभूत आहे. कारण सरकारने कन्या भ्रृण हत्या रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत असे या मोर्चेकर्याचे म्हणणे आहे. ज्योती क्रांती परिषदेने या मोर्चाचे आयोजन केले होते.

राज्यात महिला पुरुष प्रमाण १००० पुरुषांमागे ८९९ महिला असे आहे. त्यामुळे अनेक उपवर मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत. त्यामुळे अश्या उपवर मुलांना मुली मिळवून देण्यास सरकार आणि प्रशासनाने मदत करावी अशी त्यांची मागणी आहे. या संदर्भातील एक पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले गेले आहे. ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश बारस्कर म्हणाले आमच्या मोर्चाची टर उडविली गेली, चेष्टा केली गेली पण ही परिस्थिती त्यामुळे बदलणार नाही. मुलीचे प्रमाण कमी होत असल्याने अनेक योग्य वरांना वधू मिळत नाहीत आणि त्याला सरकार जबाबदार आहे.