देशाला मिळणार पहिली मुस्लीम महिला फायटर पायलट
मिर्झापूरच्या जसोल या छोट्याश्या गावातील टीव्ही दुरुस्ती करणारे शाहीद अली यांची कन्या सानिया मिर्झा देशातील पहिली मुस्लीम महिला फायटर पायलट बनणार आहे. यंदाच्या वर्षात पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश परीक्षेत सर्व परीक्षा पार करून सानिया फायटर पायलट प्रशिक्षणासाठी निवडली गेली असून तिने आपले स्वप्न साकार केले आहे. मनोधैर्य आणि आत्मविश्वास असेल तर कितीही खडतर मार्ग पार करता येतो याचाच धडा सानियाने घालून दिला असून अन्य मुलींसाठी ती प्रेरणा बनली आहे.
१० वी पर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केलेल्या सानियाला खरेतर अभियंता बनायचे होते पण त्याचवेळी पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी विषयी तिच्या वाचनात आले आणि सानियाने हाच मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. कसून मेहनत आणि अभ्यास करून तिने एनडीएची परीक्षा दिली पण पहिल्या वेळी तिला अपयश पाहावे लागले. हार न मानता तिने दुसर्या वेळी परीक्षा दिली आणि त्यात यशस्वी झाली. २७ डिसेंबर रोजी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत हजर राहण्याचे पत्र आलेले पाहून तिच्या कुटुंबाला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटला.
पारंपारिक मुस्लीम समाजातील सानियाच्या आईवडिलांनी तिच्या लग्नासाठी पैसे साठविण्याऐवजी तिच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे गावात त्यांच्यावर टीका, कुचेष्टा झाली. पण हार न मानता त्यांनी सानियाच्या इच्छेला प्राधान्य दिले. तिचे आईवडील सांगतात, आज सानियाने केवळ त्यांचेच नाही तर देशाचे नाव रोशन केले आहे. तिचा आम्हाला अभिमान वाटतो.’
२०२२ मध्ये एनडीए मध्ये महिला आणि पुरुष मिळून एकूण ४०० जागा भरल्या गेल्या त्यात १९ जागा महिलांसाठी राखीव होत्या आणि त्यातील दोन फायटर पायलट साठी होत्या. त्यात सानियाची निवड झाली आहे.