आर्जेन्टिनाच्या चलनावर मेस्सीची प्रतिमा?

फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये आर्जेन्टिनाने फ्रांसचा पराभव करून जिंकल्यावर आर्जेन्टिनाच्या चलनावर देशाचा फुटबॉल कप्तान लियोनेल मेस्सी यांची प्रतिमा छापली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्जेन्टिनाच्या फायनान्शीयल गव्हर्निंग बॉडीने मेस्सीची प्रतिमा चलनी नोटेवर छापण्याची योजना आखली असल्याचे सांगितले जात आहे. त्या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार बँकांनी चेष्टेने आर्जेन्टिना वर्ल्ड कप जिंकला तर मेस्सीची प्रतिमा नोटेवर छापण्याचा प्रस्ताव दिला होता. वर्ल्ड कप फायनल पूर्वी त्यावर चर्चा झाली होती.

एल फायनेन्सिएरो आर्जेन्टिना रेग्युलेटर बँकेने देशाच्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयाची खास दाखल घेऊन एक बैठक घेतली. फुटबॉल क्लब बोका ज्युनियर्सचे समर्थक व बँक संचालक लीसेन्द्रो क्लेरी यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली. अशी नोट आर्जेन्टिना कलेक्टिंग स्पिरीट जागवेल असे त्यांचे म्हणणे होते.

१००० पेसो मूल्याच्या नोटेवर मेस्सीची प्रतिमा छापली जावी असे मत व्यक्त केले गेले. कारण मेस्सीचा जर्सी नंबर १० असल्याने १० पासून सुरु होणाऱ्या मूल्याची नोट हवी होती. टीमच्या प्रशिक्षकाला सन्मान म्हणून नोटेच्या मागच्या भागात एफएफ ला स्केलोनेटा (लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील टीमचे टोपण नाव) लिहिले जाणार आहे असे समजते. सोशल मिडीयावर १००० पेसोच्या नोटेवर मेस्सीची तस्वीर असलेले फोटो वेगाने व्हायरल होऊ लागले आहेत.