नवीन वर्षाच्या अश्याही काही अनोख्या परंपरा

जगाला आता नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. नवीन वर्ष साजरे करण्याची विविध देशांची आपली अशी खास परंपरा आहे. त्यातील काही परंपरा मजेदार म्हणता येतील अश्याही आहेत.

कोलंबिया मध्ये नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा युनिक म्हणावी अशी आहे. त्याला ‘अगुएरो’ असे म्हटले जाते. त्यानुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या बेडखाली तीन बटाटे ठेवले जातात. त्यातील एक बटाटा सालासकट असतो, दुसरा साले पूर्ण काढलेला तर तिसरा अर्धा सालासकट आणि अर्धा साल काढलेला असतो. त्या व्यक्तीने रात्री डोळे बंद करून त्यातील एक बटाटा हातात घायचा. त्यानुसार त्या व्यक्तीला ते वर्ष नशीब फळफळवणारे जाणार, आर्थिक तंगीचे जाणार की दोन्हीचे मिश्रण असलेले जाणार हे ठरते.

स्पेनमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी रात्री बारा द्राक्षे खाण्याची प्रथा आहे. ही बारा द्राक्षे म्हणजे वर्षाच्या बारा महिन्याचे गुडलक मानले जाते. मोठ्या शहरातून मुख्य चौकात लोक एकत्र जमतात आणि द्राक्षे खाण्याचा कार्यक्रम होतो. तुर्कस्थानात रात्री १२ वाजता दरवाज्यावर मीठ शिंपडले जाते. त्यामुळे पूर्ण वर्ष घरात शांती, समृद्धी नांदते असा समज आहे.

ब्राझील मध्ये नवीन वर्षात स्पेशल अंडरवेअर वापरल्या जातात. लाल रंगाच्या अंडरवेअर प्रेमाचे प्रतिक मानल्या जातात तर पिवळ्या रंगाच्या अंडरवेअर पैसे घेऊन येणाऱ्या मानतात.

ग्रीस मध्ये नवीन वर्षाच्या रात्री घराच्या दरवाज्यावर कांद्याचे घोस लटकविले जातात. कांदा सौभाग्य घेऊन येतो अशी कल्पना आहे. कांद्याची मुळे जितकी लांब तेवढी जीवनात समृद्धी अशी भावना असते.