सरत्या वर्षात मुकेश अंबानींची २८५० कोटींची खरेदी

आशिया खंडातील दोन नंबरचे धनकुबेर आणि रिलायंस उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी वर्षअखेर जर्मन रिटेल विक्रेते मेट्रो एजीच्या भारतातील चेनची खरेदी केली असून त्यासाठी २८५० कोटी रुपये दिले गेले आहेत. रिलायंसची उपकंपनी रिलायंस रिटेल भारतीय रिटेल सेक्टर मध्ये आपली स्थिती मजबूत बनवत आहे. त्या उद्देशाने रिलायंस रिटेल व्हेन्चर लिमिटेड ने मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया लिमिटेड (मेट्रो इंडिया)ची १०० टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. या करारावर नुकत्याच सह्या झाल्याचे समजते.

मेट्रो इंडिया २००३ मध्ये देशात कॅश अँड कॅरी व्यवसाय फॉर्मेट सादर करणारी पहिली कंपनी म्हणून भारतात व्यवसाय करत होती. सध्या या कंपनीची २१ शहरात ३१ मोठी दुकाने असून त्यात ३५०० कर्मचारी काम करतात. मल्टी चॅनल बी टू बी( बिझिनेस टू बिझिनेस) कॅश अँड कॅरी होलसेल भारतात सुरु करून जास्त बी टू बी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा उद्देश होता आणि त्यातून १० लाख ग्राहक, आपले स्टोर नेटवर्क तसेच ईबीटूबी अॅपच्या माध्यमातून खरेदी करत आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीची विक्री ७७०० कोटींची झाली असून कंपनीने उत्तम कामगिरी बजावली आहे.

मेट्रो इंडियाचे अधिग्रहण करून रिलायंस रिटेल फिजीकल स्टोर्स, पुरवठा साखळी, प्लॅटफॉर्म, सोर्सिग क्षमता मजबूत करणार आहे. प्रमुख शहरात मोक्याच्या ठिकाणी स्टोर्स नेटवर्क वाढणार आहे. रिलायंस सध्या १६६०० पेक्षा जास्त स्टोर्स असलेले भारतातील सर्वात मोठे रिटेल व्यावसायिक आहेत. मेट्रो ३४ देशात होलसेल, फूड रिटेल क्षेत्रात टॉपवर आहे.