‘मॅकडोनल्ड’ जगातील सर्वात मोठी फास्ट फूड चेन

सुमारे तीन दशकांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये भारताने मुक्त बाजार सुरु केला आणि विदेश कंपन्यांनाही देशात व्यवसाय करण्याची मुभा दिली. जागतिकीकरणाच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु झाली आणि त्याचवेळी अमेरिकन फूड चेन ‘मॅकडोनल्ड’ भारतात प्रवेश करती झाली. पांढऱ्या कागदात गुंडाळलेला बर्गर हातात धरून चालता चालता खाण्याची सोय आणि भुकेला एक चांगला पर्याय या निमित्ताने उपलब्ध झाला. ‘मॅकडोनल्ड’ ने लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या असे म्हटले तरी ते योग्यच ठरेल. आज ‘मॅकडोनल्ड’ जगातील सर्वात मोठी फास्ट फूड चेन बनली असून दररोज जगभरात ७ कोटी लोक ‘मॅकडोनल्ड’ चे पदार्थ रिचवतात असे आकडेवारी सांगते.

आज भारतात कंपनीची ५०० आउटलेट आहेत. कंपनीने बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनला कंपनीचा सदिच्छा दूत बनविल्यापासून ‘मॅकडोनल्ड’ अधिक चर्चेत आली आहे. १९४० मध्ये रिचर्ड आणि मॉरीस या दोन बंधूनी त्यांच्या ‘मॅकडोनल्ड’ या आडनावाचा वापर करून कंपनीची सुरवात केली होती. सुरवातीला हे बार्बेक्यू होता पण नंतर बर्गर, फ्राईज, बेवरेजेस त्यात जोडले गेले. १९५५ मध्ये सेल्समन रे क्रोक यांनी ही कंपनी हस्तगत केली आणि स्वतः मालक बनला. त्यासाठी त्याने या दोन्ही भावांना १०-१० लाख डॉलर्स दिले आणि स्वतः संस्थापक असल्याचे जगाला भासविले.

पण त्यानंतर अनेक वर्षांनी क्रोक याने सत्य जगापुढे उघड केले. मात्र क्रोकने कंपनीचा व्यावसाय वेगाने वाढविला आणि १० वर्षात ७०० आउटलेट सुरु केली. १९६५ मध्ये अमेरिकेबाहेर पहिले आउटलेट कॅनडा मध्ये सुरु झाले. भारत ‘मॅकडोनल्ड’ ची आउटलेट असलेला ९५ वा देश आहे. आज ४० हजार कौन्टर्स वर कंपनी सेवा देत आहे. कंपनीची वर्षाची उलाढाल २२ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे १ लाख कोटींची आहे. विशेष म्हणजे बर्गर पेक्षा या कंपनीच्या फ्रेंच फ्राईजला लोकांची अधिक पसंती असून दररोज सुमारे ४५०० टन फ्रेंच फ्राईज जगभर विकले जातात.