मानवी त्वचेपासून बनलेल्या वस्तूंची डार्क वेबवर विक्री

फॅशनच्या नावाखाली काय काय चालेल यांचा अंदाज करणे कठीण आहे. माणसाने आपल्या चैनीसाठी मुक्या प्राण्यांचा बळी निस्संकोच पणे घेतला आहे. पश्मीना, याक लोकर, प्राण्यांच्या कातड्यापासून बनविलेल्या पर्स, जॅकेट, बूट आणि अन्य फॅशन वस्तू, मिंक कोट अशी त्यांची उदाहरणे आहेत. या वस्तू प्रचंड किमतींना विकल्या जातात. त्यातच आता डार्क वेबवर मानवी त्वचेपासून बनविलेल्या पर्सेस, बूट, जॅकेट यांची विक्री होत आहे. पर्सच्या किमती ११ लाख तर बूटच्या किमती २२ लाखांपर्यंत आहेत. इंटरनेट डार्क वेबवर मानवी त्वचा किंवा कातडी प्रती इंच ८२७ रूपये दराने विकली जात आहे.

डार्क वेबवर अवयव तस्करी आणि त्वचा विक्री होत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. यात मानवी त्वचा अनेकदा मृत देहांवरून काढून घेतली जाते तर अशी त्वचा टिश्यू कल्चर किंवा डीएनए पासून तयार केली जाते असे सांगितले जाते. मृतांच्या त्वचेचे टॅनिंग करून त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि त्या कातड्यापासून पर्सेस, बूट बनविले जातात असे समजते.

१४ डिसेंबर २०२२ रोजीच न्यूयॉर्क मध्ये ‘पेटा’ शी संबंधित एका मॉडेलने मानवी त्वचेसारखा ड्रेस घालून रँप वॉक करून त्यातून संदेश दिला होता. या संदेशातून फॅशनच्या नावाखाली मुक्या प्राण्याशी क्रूरता नको, कातडी उत्पादनांवर बंदी घाला असे सुचविले गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षाला कातड्यासाठी १०० कोटी प्राणी ठार केले जातात. १ हजार किलो कातडे धुणे, रंगविण्यासाठी ५० हजार लिटर पाणी नासले जाते आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या चाळीस धोकादायक रसायनामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अकाली मृत्यू होतात. मात्र डार्क वेबने त्यापुढे पाउल टाकून मानवी त्वचेच्याच वस्तू विक्रीला आणल्या आहेत.