चीन मध्ये कोविड मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी रांगा

चीनने झिरो कोविड धोरण काही अंशी मागे घेतल्यावर देशात कोविड संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढली असून मृत्यूंची संख्या १० लाखांवर जाईल अशी भीती व्यक्त होत आहे. हॉस्पिटल मध्ये रुग्ण भरतीसाठी तसेच मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ मोठ्या रांगा लागल्याचे व्हिडीओ प्रसारीत होऊ लागले आहेत. पुढचे तीन महिने चीन मध्ये करोनाच्या तीन लहरी येतील असे म्हटले जात असून मृतांची संख्या १० लाखाचा आकडा ओलांडेल असा दावा केला जात आहे.

चीन बरोबरच जपान, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग आणि तैवान येथेही करोना संक्रमित वेगाने वाढत आहेत. ३ वर्षांपूर्वी नोव्हेंबर मध्ये प्रथम चीन मध्ये करोना रुग्ण आढळला होता. तेव्हापासून करोना विरुद्धची लढाई चीन मध्ये सुरु आहे. मात्र आता करोना संक्रमण वेग प्रचंड असूनही सरकार रुग्ण आणि मृत्यूचे खरे आकडे लपवत आहे. नोव्हेंबर मध्ये ११ मृत्यू झाल्याचे सांगितले गेले असले तरी रूग्णालयाबाहेर लागलेल्या रांगा आणि अंत्यसंस्कारासठी लागलेल्या रांगा खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देत असल्याचे मानले जात आहे. हे व्हिडीओ सोशल मिडीयावर येत आहेत. शवागारात जास्त कर्मचारी तैनात केले गेल्याचे व्हिडीओ पण येत आहेत.

चीनचे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. वू जुन्यो यांच्या म्हणण्यानुसार पुढील तीन महिने करोनाच्या तीन लहरी येतील आणि त्याचा प्रभाव पूर्ण देशभर असेल. सध्या करोनाची पहिली लाट आहे. दुसरी जानेवारीच्या शेवटी येईल. याच काळात चीन मध्ये नववर्ष उत्सव साजरा होतो. त्यामुळे तिसरी लाट फेब्रुवारीचा शेवट ते मार्च या काळात येईल. मिळालेल्या माहितीनुसार ज्या रुग्णांना मधुमेह किंवा हृदय विकार नाही पण त्यांचा मृत्यू करोनाने झाला आहे अशाच केसेस चीन करोना मृत्यू म्हणून गणना करत आहे. देशात ९० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तर अनेकांना तिसरा डोस मिळालेला नाही आणि चीनी लस कमी प्रभावी ठरली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर करोना होताना दिसत आहे असे समजते.