या देशात जीभ दाखवून केले जाते स्वागत
जगात प्रत्येक देशाची स्वागत करण्याची पद्धती किंवा रिती रिवाज वेगवेगळे आहेत. नमस्कार करून, हात हलवून, कमरेत वाकून, कुंकुमतिलक लावून, पायाला हात लावून, हस्तांदोलन करून, सॅल्युट करून असे हे अनेक प्रकार आहेत. भारतात सर्वसाधारण नमस्ते करून म्हणजे दोन्ही हात जोडून स्वागत केले जाते. आपल्याकडे जीभ बाहेर काढून दाखविणे हा एखाद्याचा अपमान म्हणून त्याकडे पाहिले जात असले तरी आपला शेजारी तिबेट मध्ये मात्र पाहुण्यांचे स्वागत किंवा एकमेकांना अभिवादन करताना जीभ बाहेर काढून दाखविण्याची प्रथा आहे.
ही प्रथा फार जुनी म्हणजे ९ व्या शतकापासूनची आहे. त्यावेळचा तिबेटचा राजा लान्ग धर्मा याची जीभ काळी होती. आणि हा राजा क्रूरकर्मा होता. तो प्रजेचा छळ करत असे. तिबेट मध्ये पुनर्जन्मावर लोकांचा विश्वास आहे. राजा लान्ग धरमा मरण पावल्यापासून येथील लोक अभिवादन करताना जिभ बाहेर काढून दाखवितात. त्यात त्यांचा उद्देश तुमची जीभ काळी नाही हे जाणून घेण्याचा असतो. जीभ काळी नाही म्हणजे राजा लान्गधरमाचा पुनर्जन्म तुम्हाला आलेला नाही हे दाखविण्याचा प्रकार आहे.
याशिवाय जीभ दुरूनच बाहेर काढून दाखविली जाते त्यामुळे एकमेकांचा थेट संपर्क येत नाही. परिणामी कुणाला कसला संसर्ग असेल तर तो आपल्याला होऊ नये याची ही एकप्रकारे घेतलेली काळजी असेही मानले जाते.