भारतवंशीय अनेक लोक विदेशात महात्वाची स्थाने भूषवित आहेत. अमेरिकेच्या कमला हॅरीस, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी तर जगातील महाशक्तींचे नेतृत्व करण्याचे गुण त्यांच्यात आहेत हे सिद्ध केले आहे. त्याच यादीत आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर सामील झाले आहेत. आयर्लंडच्या पंतप्रधानपदावर लिओ दुसऱ्या वेळी आरूढ झाले आहेत. विशेष म्हणजे लिओ यांचे कुटुंब मूळचे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड या गावाचे आहेत. लिओ यांचे वडील अशोक डॉक्टर होते आणि लिओ सुद्धा डॉक्टर आहेत. विशेष म्हणजे लिओ मराठी बोलू शकतात. वडिलांकडून त्यांनी मराठी शिकली आहे.
लिओ यांचा जन्म डब्लिन येथे झाला असून त्यांची आई आयरिश होती आणि त्या नर्स होत्या. वडील डॉक्टर होते. ४३ वर्षीय लिओ आयर्लंडचे पहिले अश्वेत आणि गे पंतप्रधान आहेत. २०२० मध्ये आयर्लंड मध्ये सुद्धा आघाडी सरकार बनले होते. त्यावेळी लिओ यांच्या फिने गिल आणि मार्टिन यांच्या फियेना फेल या दोन पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनविले आणि त्यात अडीच अडीच वर्ष पंतप्रधान पद विभागून घेण्याचा करार केला होता. लिओ २०१७ ते २०२० मध्ये प्रथम पंतप्रधान बनले होते. २०२० च्या निवडणुकानंतर प्रथम मार्टिन पंतप्रधान बनले आणि त्यांची अडीच वर्षे पूर्ण झाल्यावर लिओ पंतप्रधान बनले आहेत.
२९ डिसेंबर २०१९ ला लिओ यांनी महाराष्ट्रातील आपल्या पैतृक गावी भेट दिली होती. हा त्यांचा खासगी दौरा होता आणि त्यावळी त्यांनी ग्रामदेवतेची पूजा केली होती. लिओ यांनी चार वेळा भारताला भेट दिली आहे.