फिफा वर्ल्ड कप, आर्जेन्टिना बरोबर गुगलचेही सर्वाधिक सर्चचे रेकॉर्ड

कतार येथे झालेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना मोठ्या औत्सुक्यात पार पडला. आर्जेन्टिनाने फ्रांसवर शूट आउट मध्ये ४-२ ने विजय मिळविला आणि अनेक प्रकारची रेकॉर्ड या सामन्यात नोंदविली गेली. त्याचबरोबर टेक कंपनी गुगलनेही त्यांच्या २५ वर्षाच्या इतिहासातील रेकॉर्ड नोंदविले असल्याचे अल्फाबेट सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्वीट केले आहे.

जगात बहुसंख्य नागरिक काहीही जाणून घ्यायचे असेल तर गुगल सर्च करतात. कोणतीही छोटी मोठी घटना गुगल सर्च वरून जाणून घेता येते. दरवर्षी गुगल त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सर्वाधिक सर्च झालेल्या विषयांची यादी प्रसिद्ध करते. त्यात चित्रपट, कलाकार, खेळाडू यांच्या याद्याही असतात. पिचाई यांच्या अधिकृत खात्यावरून केलेल्या ट्वीट मध्ये ते म्हणतात,’ २५ वर्षात प्रथमच फिफा वर्ल्ड कप सर्चने रेकॉर्ड ब्रेक केले. जगातले सर्व लोक फक्त फिफा वर्ल्ड कप सर्च करत असावेत असे वाटावे इतका ट्रॅफिक रविवारी पाहायला मिळाला.’

गुगल सर्च इंजिनची सुरवात १९९८ मध्ये लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी केली. काहीही सर्च करण्यासाठी गुगलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि गुगल त्यांच्या सेवेमध्ये सातत्याने सुधारणा करत असते. २०२२ मध्ये सर्च इंजिन पुरविणाऱ्या कंपन्याच्या बाजार हिश्यात गुगलचा वाटा ९० टक्के आहे.