गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई पंतप्रधान मोदींना भेटले

अल्फाबेट या गुगलच्या पैतृक कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित गुगलची सर्वात मोठी मीट ‘गुगल फॉर इंडिया’च्या आठव्या कार्यक्रमासाठी पिचाई भारतात आले आहेत. त्यांनी सोमवारी मोदी यांची भेट घेतल्याचे ट्वीट त्यांच्या अधिकृत खात्यावरून केले आहे. त्यात पिचाई म्हणतात,’ आजच्या छान मुलाखती बद्दल पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद. तुमच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञान परिवर्तन अतिशय वेगाने होत आहे त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. सर्वांसाठी काम करणारे एक खुले, कनेक्टेड इंटरनेट विकसित करण्यासाठी भारताच्या जी २० अध्यक्षतेचे आम्ही समर्थन करतो आणि आमचे सहकार्य आणि सहभाग भक्कम राहील.’

पिचाई यांनी तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली. वैष्णव गुगलच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. पिचाई आणि वैष्णव यांच्यात भारतात एआय व एआय आधारित सोल्युशन्स या विषयावर चर्चा झाली. पिचाई यांनी भारत ही मोठी निर्यात अर्थव्यवस्था आहे असे सांगून गुगल १०० हून अधिक भारतीय भाषांत एक इंटरनेट सर्च मॉडेल विकसित करत असल्याचे सांगितले. महिला नेतृत्व करत असलेल्या स्टार्टअपना ७५ हजार कोटींची मदत गुगल करणार असल्याचेही पिचाई यांनी नमूद केले.