ही आहे देशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन

भारतात रेल्वेचे जाळे दूरवर पसरलेले असून दररोज लाखोंच्या संखेने लोक रेल्वे प्रवास करत असतात. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी, या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे सारखे स्वस्त, सुरक्षित माध्यम नाही असे म्हटले जाते. देशात सध्या अनेक वेगवान रेल्वे सुरु झाल्या आहेत. पण सर्वाधिक लांबीचा प्रवास करणारी रेल्वे कुठली याचे उत्तर अनेकांना माहिती नसेल. आपल्या कडे अनेक रेल्वे गाड्या धावत असल्या तरी इतका लांबचा प्रवास करणाऱ्या, किंवा अधिक डबे असलेल्या रेल्वे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत.

भारतातील सर्वात लांबचा प्रवास करणारी रेल्वे गाडी आहे ‘विवेक एक्प्रेस’. ही गाडी कन्याकुमारी ते दिब्रुगड असा ४२३४ किमीचा प्रवास करते. तिला २३ डबे जोडले जातात. त्या अर्थाने सुद्धा ही गाडी लांब आहे. तिरुवनंतपुराम, कोईमटूर, विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कटक, जलपायगुरी अशी स्टेशन घेत ती आसाम मधील दिब्रुगड येथे पोहोचते. या प्रवासासाठी तिला पाच दिवस लागतात. दुसरी प्रवासी गाडी आहे प्रयागराज दिल्ली दरम्यान धावणारी प्रयागराज एक्स्प्रेस. या गाडीला २४ डबे आहेत.

भारताच्या ७५ व्या स्वातंत्रदिन दिवस निमित्ताने सुरु झालेली सुपर वासुकी, २९५ डबे असलेली रेल्वे ३.५ किमी लांबीची आहे. तिला सहा इंजिन लावली जातात. छत्तीसगडच्या कोरबा येथून नागपूर राजनंदगाव असा तिचा मार्ग आहे. शेष नाग ही रेल्वे २.८ किमी लांबीची असून तिला ४ इंजिन्स लावली जातात. या दोन्ही मालगाड्या आहेत. नागपूर ते विलासपूर असा शेषनागचा प्रवास आहे.