पवारांच्या घराचे स्वयंपाकघर तेलंगणात, बेडरूम्स महाराष्ट्रात

(फोटो सौजन्य एएनआय)

उत्तम पवार यांचे १२-१३ लोकांचे कुटुंब महाराष्ट्र आणि तेलंगण अश्या दोन्ही राज्यात राहण्याचे सुख अनुभवते आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील सीमा वाद वारंवार उफाळत असताना महाराष्ट्र तेलंगण राज्याच्या सीमेवरील पवार कुटुंबाचे हे घर सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाले आहे. हे घर आठ खोल्यांचे आहे. त्यातील चार खोल्या तेलंगण राज्याच्या हद्दीत येतात तर उरलेल्या चार खोल्या महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत. चंद्रपूर जिल्हा सीमा जिवती तहसील मधील महाराजगुडा या गावात हे अनोखे घर आहे.

उत्तम पवार आणि त्यांचे भाऊ या घरात राहतात. उत्तम यांचे स्वयंपाक घर तेलंगण हद्दीत आहे तर चार बेडरूम महाराष्ट्र हद्दीत आहेत. १९६९ मध्ये सीमा सर्व्हेक्षण झाले तेव्हा पवार कुटुंबाला त्यांचे घर दोन राज्यात अर्धे अर्धे विभागले गेल्याचे कळले. त्यांना अजून तरी त्यापासून काहीही त्रास झालेला नाही. पवार सांगतात आम्ही दोन्ही राज्याच्या ग्रामपंचायतीना कर देतो. दोन्ही राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळतो. पण त्यातही तेलंगण सरकारी योजनाचा अधिक लाभ मिळतो. या घराच्या ज्या खोल्या ज्या राज्यात येतात त्यांच्या भिंतींवर त्या त्या राज्यांची नावे लिहिली गेली आहेत. एक भिंत अशीही आहे जी दोन्ही राज्याच्या हद्दीत येते त्यामुळे त्या भिंतीवर दोन्ही राज्याची नावे लिहिली आहेत.

या कुटुंबातील काही सदस्य तेलंगाना राज्याचे नागरिक आहेत तर काही महाराष्ट्राचे. पवार कुटुंब या सीमावर्ती घरात अतिशय आनंदाने नांदते आहे.