ऋषी सुनक यांची खुर्ची डळमळीत?

भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पंतप्रधानपद धोक्यात असल्याची चर्चा सुरु झाली असून द ऑब्झर्वर ने घेतलेल्या एका ओपिनियन पोल मधून तसे संकेत मिळाल्याचे सांगितले जात आहे. ४२ वर्षीय सुनक यांनी २४ ऑक्टोबर रोजी ब्रिटन पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली होती. सध्या ब्रिटन मध्ये नाताळच्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे राजकीय हालचाली सुद्धा कमी आहेत. मात्र लवकरच या हालचालींना वेग येईल असे सांगितले जात आहे.

हाउस ऑफ लॉर्ड सत्तारूढ हुजूर पार्टीचे सदस्य व मोठ्या देणगीदारांपैकी एक लॉर्ड पीटर क्रुडास यांनी ऑब्झर्वरशी बोलताना काही तरी गडबड होणार असल्याचे म्हटले आहे. संसद सदस्यांच्या मनात ऋषी यांच्या विषयी नाराजी आहे त्यामुळे सुनक यांचा रस्ता काटेरी बनल्याचे पीटर यांचे म्हणणे आहे. १९८० नंतर प्रथमच ब्रिटन मध्ये सुरु असलेले युनियन संप आणि करवाढ नको असलेले मतदार सुनक याच्या विरोधात जाऊ शकतात असे म्हटले जात आहे.

पीटर क्रुडास यांनी पक्षाला ३.५ दशलक्ष पौंडांची देणगी दिली आहे. जुलै मध्ये बोरिस जोन्सन यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले होते तेव्हा ऑक्टोबर मध्ये बोरिस पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी समर्थन दिलेल्या सदस्यात पीटर आघाडीवर होते. त्यामुळे सुनक यांना हटविण्याची योजना आखली जात आहे असे संकेत त्यांनी दिले असावेत असे म्हटले जात आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा ब्रिटन मध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.