वर्ल्ड कप जिंकला, खास काळ्या कोटाचा सन्मान, निवृत्त होणार नाही मेस्सी

१८ डिसेंबर २०२२, कतारच्या लुसेल स्टेडीयम मध्ये रंगलेला फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीचा सामना. सर्व जगाचे लक्ष आपला करिअरचा हा अंतिम वर्ल्ड कप सामना असेल अशी अगोदरच घोषणा केलेला आर्जेन्टिनाचा कप्तान लियोनेल मेस्सी. मेस्सी करियरची अखेर विजयाने करणार का याची उत्सुकता असलेले करोडो प्रेक्षक. फ्रांसला पेनल्टी शूट आउट मध्ये ४-२ अशी मात देत आर्जेन्टिनाने ३६ वर्षाच्या गॅप नंतर तिसऱ्या वेळी वर्ल्ड कप मिळविला. पण त्यानंतर आपल्या सर्व चाहत्यांना मेस्सीने फुटबॉल संन्यास घेणार नसल्याचे दिलेले संकेत सुखद धक्का देऊन गेले आहेत. आपण आर्जेन्टिना कडून खेळणार आहोत असे मेस्सीने सांगितल्याचे टीवाय स्पोर्ट्सच्या रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे. राष्ट्रीय टीम मधून मेस्सी निवृत्त होणार नाही. आर्जेन्टिनाच्या जर्सी मध्ये वर्ल्ड चँपियन प्रमाणे खेळणार असे मेस्सी म्हणाल्याचे यात नमूद केले गेले आहे.

या अंतिम सामन्यात चषक मिळविल्यावर मेस्सी ने आर्जेन्टिनाच्या प्रतिष्टीत निळ्या पांढऱ्या जर्सीवर काळा कोट घातल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. त्याबद्दल कुतूहल व्यक्त होत आहे. मात्र अरब देशात हा कोट फार महत्वाचा असून बिश्त या नावाने ओळखला जाणारा हा कोट फक्त धार्मिक गुरु किंवा राजघराण्यातील व्यक्ती विशेष कार्यक्रमात घालू शकतात. अन्य सर्वसामान्य लोक हा कोट वापरू शकत नाहीत. हा कोट खास पद्धतीने तयार केला जातो. त्यात उंटाचे केस आणि बकरीच्या लोकरीचा वापर केला जातो. कतार अमीर तमिम बिन हमद अल यांनी मेस्सीच्या अंगावर हा कोट चढविला. मेस्सी साठी हा मोठा सन्मान ठरला आहे.

याचबरोबर मेस्सीने अनेक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर नोंदविताना गोल्डन बॉलचा मान सुद्धा मिळविला आहे.