फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी विषयी खास माहिती

रविवारी रात्री कतारमधल्या लुसेल शहरात जगातील दोन नंबरच्या स्पोर्ट इव्हेंट फिफा वर्ल्ड कप साठी अंतिम लढत होत असून त्यात फ्रांस आणि आर्जेन्टिना एकमेकाशी लढणार आहेत. ऑलिम्पिक हा जगातील पहिला मोठा स्पोर्ट इव्हेंट आहे आणि त्यानंतर फिफा वर्ल्ड कपचा नंबर आहे. वर्ल्ड कप विजेत्याला चमचमती ट्रॉफी उंचावून दाखविण्याची संधी मिळणार असली तरी ही फिफा वर्ल्ड कपची ओरिजिनल ट्रॉफी नाही. मूळ ट्रॉफी झुरीख येथील फिफा मुख्यालयात असते आणि क्वचित प्रसंगी ती जगासमोर आणली जाते. विजेत्याला या ट्रॉफीची प्रतिकृती दिली जाते.

फिफा वर्ल्ड कपची सुरवात १९३० साली झाली त्यावेळी जी ट्रॉफी होती तिचे नाव ‘जुल्स  रीमेट ट्रॉफी’ असे होते आणि १९७० पर्यंत हीच ट्रॉफी विजेत्याला दिली जात असे. ब्राझीलने सर्वाधिक तीन वेळा ही ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर फिफाच्या नव्या ट्रॉफीचे डिझाईन केले गेले. तीच सध्याची ट्रॉफी असून तिला ‘फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी’ असेच म्हटले जाते. १९७४ मध्ये प्रथम ही ट्रॉफी विजेत्याला दिली गेली. त्यानंतर १२ टीम्सना ती दिली गेली असून सर्वाधिक तीन वेळा जर्मनीने ही ट्रॉफी जिंकली आहे.

या ट्रॉफीचे डिझाईन इटलीच्या सिल्वियो गाजानिया यांनी केले आहे. नव्या ट्रॉफीच्या डिझाईन साठी ७ देशातील शिल्पकारांनी ५३ प्रस्ताव पाठविले होते त्यात सिल्वियो यांचे डिझाईन सर्वश्रेष्ठ ठरले. या ट्रॉफीचे वजन ६.१७५ किलो असून अठरा कॅरेट सोने त्यासाठी वापरले गेले आहे. तिची लांबी ३६.५ सेंटीमीटर असून पृथ्वी पकडलेल्या दोन मानवी आकृत्या त्यात आहेत. ही ट्रॉफी आतून पोकळ आहे.

१९९४ मध्ये या ट्रॉफी मध्ये थोडा बदल करून विजेत्या टीमची नावे खाली लिहिता यावीत यासाठी खाली प्लेट लावली गेली आहे. २०१८ मध्ये या ट्रॉफीचे मुल्यांकन १ कोटी ३३ लाख रुपये होते. मूळ ट्रॉफीची ही प्रतिकृती कांस्य धातूची असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला गेला आहे. २००५ पासून मूळ ट्रॉफी विजेत्यांना न देण्याचा निर्णय घेतला गेला होता.