जगात नोकरी कपात , भारतात मात्र दोन लाखाहून अधिक रोजगार

जगभरात वाढती महागाई, मंदीची शंका यामुळे अमेझोन, मेटा, गुगल, सारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरु केली आहे आणि नवी नोकरभरती थांबविली आहे मात्र या उलट परिस्थिती भारतात असून या काळात भारतात इंडिया युनिकॉर्न कंपन्यांनी फक्त २०२२ च्या एका वर्षात २ लाखाहून अधिक रोजगार दिले आहेत. इंडियन स्टार्टअपसचे यात मोठे योगदान असल्याचे ‘स्ट्राईड वन’ या अर्थविषयक सेवा प्लॅटफॉर्मच्या अहवालात म्हटले गेले आहे.

या रिपोर्ट नुसार भारत सरकार डिजिटल अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने प्रयत्न करते आहे त्याचा परिणाम म्हणून २०२५ पर्यंत या नोकऱ्यात ७० टक्के वाढ अपेक्षित आहे. भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम अमेरिका आणि चीन नंतर तीन नंबरवर आहे. देशात ७ लाख ७० हजाराहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप आहेत. १०८ युनिकॉर्न सह त्यांचे संयुक्त मुल्यांकन ४०० अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे. फंडिंग पुरेश्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने स्टार्टअप कंपन्यांची क्षमता वाढली आहे आणि जागतिक बाजारात विस्ताराच्या अनेक संधी त्यांना मिळत आहेत. याचा परिणाम म्हणून लाखो नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर महत्वपूर्ण प्रभाव पडला असून दरडोई उत्पन्नात ४ ते ५ टक्के योगदान देण्याची क्षमता या स्टार्टअपस ची आहे.