चीन मध्ये २०२३ मध्ये  करोना मृत्यूचे तांडव?

अमेरिकन इन्स्टीट्युट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड ईव्हॅल्युएशन म्हणजे आयएचएमई तर्फे एक नवीन अंदाज व्यक्त केला गेला असून त्यानुसार चीन मध्ये कोविड १९ साठी राबविल्या गेलेल्या झिरो कोवीड धोरणाचा प्रतिकूल परिणाम म्हणून २०२३ मध्ये देशात करोना विस्फोट होण्याची शक्यता आहे आणि त्यात किमान १ लाखाहून अधिक मृत्यू होतील असा हा अंदाज आहे. चीन मध्ये १ एप्रिलच्या आसपास करोना संक्रमण पीकवर असेल आणि त्याकाळात मृत्यूचा आकडा साडेतीन लाखांवर जाईल असे या संस्थेचे प्रमुख क्रिस्तोफर मरे यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले या काळात चीनची १/३ लोकसंख्या कोविड संक्रमित होईल.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने कोविड प्रतिबंध हटविल्यानंतर कोविडमुळे झालेल्या मृत्यू बद्दल कोणतीच माहिती अधिकृत पणे दिलेली नाही. ३ डिसेंबरला शेवटचा मृत्यू नोंदविला गेला आहे. बीजिंगच्या अधिकृत आकडेवारी नुसार ५२३५ कोविड बळी गेले आहेत. लॉकडाऊन आणि अन्य प्रतिबंधाना विरोध करण्यासाठी चीनी जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली त्यानंतर डिसेंबर मध्ये हे प्रतिबंध थोडे हटविले गेले आहेत पण चीन मध्ये संक्रमण वाढते आहे.

पुढच्या महिन्यात लुनर न्यू ईअर चीन मध्ये साजरे होईल आणि हा महत्वाचा आणि मुख्य उत्सव असतो. यामुळे चीन मध्ये १ अब्ज ४० कोटी जनतेत करोना संक्रमण फैलावू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. झिरो कोविड पॉलिसी पहिल्या कोविड व्हेरीयंटवर नियंत्रण मिळविण्यास प्रभावी ठरली पण ओमिक्रोनचा संक्रमण वेग फारच जास्त असल्याने हीच पॉलिसी लागू करून नुकसान झाले आहे असे क्रिस्तोफर यांचे म्हणणे आहे. चीनच्या वूहान मध्ये करोना आउटब्रेक झाल्यावर क्वचितच चीनने कोविड मृत्यू बद्दल माहिती जाहीर केली होती. त्यामुळे या संस्थेने हॉंग कॉंग मृत्यू दरवरून चीन मध्ये येणाऱ्या भावी संकटाचा अंदाज वर्तविला आहे.