इराणचा अफशीन इस्माईल जगात सर्वात बुटका, गिनीजने केली नोंद

जागतिक कीर्तीच्या गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविण्यासाठी परिश्रम, सातत्य, मेहनत करावी लागते हे खरे पण काही जणांना निसर्गच अशी संधी देतो कि कोणतीही विशेष मेहनत अथवा कष्ट न करता त्यांना गिनीज बुक मध्ये आपल्या नावाचे रेकॉर्ड नोंदविता येते. इराणचा अफशीन इस्माईल हा २० वर्षाचा तरुण या दुसऱ्या प्रकारात येतो. अफशीनच्या नावाची नोंद गिनीज बुक मध्ये जगातील सर्वात बुटका म्हणून केली गेली असून गिनीज बुकने या संदर्भात त्यांच्या ट्विटर अकौंटवर माहिती दिली आहे.

अफशीन याची उंची २ फुट १.६ इंच म्हणजे ६५.२४ सेंटीमीटर आहे. त्याने ३६ वर्षीय एडवर्ड निनोचे मागचे रेकॉर्ड मोडून आपले नाव गिनीज बुक मध्ये नोंदविले आहे. निनोची उंची ७२ सेंटीमीटर आहे. मंगळवारी गिनीज बुक तर्फे या नव्या रेकॉर्डची माहिती दिली गेली. अफशीन इराणच्या अझरबैजान जिल्यातील बुकान प्रांतातील आहे. त्याला कुर्दिश आणि फारसी भाषा येतात. त्याचे जन्मतः वजन ७०० ग्राम होते.

सामान्य मुलांच्यापेक्षा वेगळे आयुष्य त्याच्या वाट्याला आले. खेळ, अभ्यास यात तो मागे राहिला आणि त्यामुळे कमी वयात त्याने शाळा सोडली. अफशीनला दुबईच्या बुर्ज खलिफा मध्ये फिरायची खूप आवड आहे त्यासाठी त्याने नवे कपडे शिवले. दुबई मध्येच अफशीनची उंची गिनीज बुक अधिकाऱ्यांनी मोजली. २४ तासात तीन वेळा त्याची उंची मोजली गेली. प्रत्येक वेळी ती समान भरल्यावर मग त्याची नोंद गिनीज बुक मध्ये केली गेली.