सेलेब्रिटीजनी नाही, या उद्योजकाने खरेदी केली देशातील सर्वात महाग कार

ब्रिटीश ऑटो कंपनी मॅक्लारेनची भारतातील पहिली सर्वात महाग कार मॅक्लारेन ७६५ एलटी बॉलीवूड कलाकार किंवा अन्य सेलेब्रिटी नाही तर हैद्राबादच्या एका उद्योजकाने खरेदी केली आहे. या कारची किंमत १२ कोटी असून या कारची डिलिव्हरी उद्योजक नासीर खान यांना ताज फलूकनाम पॅलेस येथे देण्यात आली. गेल्या महिन्यात कंपनीने मुंबई येथे भारतातील पहिले शोरूम सुरु केले असून देशातील पहिली कार येथून विकली गेली आहे.

मॅक्लारेन ७६५ एलटी या सुपरकारच्या नावातील एलटीचा अर्थ  लाँग टेल असा आहे. ही कार लांबीला जास्त आणि वजनाला हलकी आहे. पॉवर व डिझाईन मुळे ही कार लोकप्रिय असून ही लिमिटेड एडिशन कार आहे. ७६५ म्हणजे या कारची ७६५ युनिट बनविली जाणार आहेत. या कारसाठी ४.० लिटर ४००० सीसी ट्वीन टर्बोचार्ज्ड व्ही ८ पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. ७ स्पीड ड्युअल क्लच ऑटो ट्रान्समिशन असून २.४ सेकंदात ० ते ९६ किमीचा वेग ही कार घेऊ शकते. तिचा टॉप स्पीड ताशी ३२५ किमी आहे.

नासीर खान यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या लाल रंगाच्या कारसह त्यांचा फोटो शेअर केला आहे. नसीर त्यांच्या सोशल मिडिया प्रोफाईलवर नेहमीच विविध अलिशान कार्सचे फोटो शेअर करतात. ते कार संग्राहक आहेत. त्यांच्या ताफ्यात रोल्स रॉईस कुलीनन, फेरारी ८१२ सुपरफास्ट, मर्सिडीज बेन्झ जी ३५० डी, फोर्डची मस्टांग, लोम्बार्गिनी अॅव्हेंडेटअर आणि उरस या कार्स आहेत.