या वर्षात भारतीयांची सर्वाधिक मागणी बिर्याणी, सामोसा आणि गुलाबजामला

भारतातील लोकप्रिय फूड डिलिव्हरी प्लटफॉर्म स्विगीने २०२२ सालचा त्यांचा एक रिपोर्ट नुकताच सादर केला आहे. त्यात भारतीयांनी या वर्षात कोणते पदार्थ सर्वाधिक प्रमाणात ऑर्डर केले त्या पदार्थांची यादी दिली गेली आहे. यात या वर्षीही बिर्याणी आघाडीवर राहिली असून गेल्या वर्षी सुद्धा बिर्याणीच प्रथम क्रमांकावर होती. यंदा मिनिटाला १३७ म्हणजे प्रती सेकंदाला २.२८ बिर्याणी ऑर्डर केल्या गेल्या. चिकन बिर्याणी, मसाला डोसा, चिकन फ्राईड राईस, पनीर बटर मसाला, बटर नान, व्हेज फ्राईड राईस, व्हेज बिर्याणी, तंदूर चिकन हे पदार्थ सर्वाधिक प्रमाणात मागविले गेले.

या रिपोर्ट मधून असेही दिसले कि खवय्यांनी यंदा अनेक नवीन पदार्थ ट्राय करण्यास पसंती दिली. त्यात भारतीय पदार्थांबरोबर, इटालियन पास्ता, पिझ्झा, मेक्सिकन बाऊल, स्पायसी रेमन, जपानी सुशी या पदार्थांचा समावेश होता. स्नॅक मध्ये सर्वाधिक मागणी ऑल टाईम फेव्हरेट सामोश्याला होती. या वर्षात सुमारे ४० लाख सामोसे ऑर्डर केले गेले. पॉप कॉर्न, पावभाजी, फ्रेंच फ्राईज, गार्लिक ब्रेडस्टिक, हॉट विंग्स, टॅकॉ, क्लासिक स्टफ्ड गार्लिक ब्रेड, मिंगल बकेट यांनाही चांगली मागणी होती.

गोड पदार्थात यंदा गुलाबजाम मागणीत आघाडीवर राहिला. यंदा २७ लाख गुलाबजाम ऑर्डर केले गेले. १६ लाख रसमलाई, १० लाख चोकलेट मावा केक, रसगुल्ले, चॉकोचिप आणि अल्फान्सो आईसक्रीम, काजू कतली आणि टेंडर कोकोनट आईसक्रीम ला सुद्धा यंदा चांगली मागणी होती.