सीमेवर भिडलेल्या भारत चीन सैन्यात म्हणून होत नाही गोळीबार

अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागात भारत चीन सैनिकात हाणामारी झाल्याचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. भारत आणि चीनी सैन्यात अश्या चकमकी वारंवार होत असल्या तरी त्यात गोळीबार केला जात नाही तर काठ्या लाठ्या, बुक्के, हाणामारी अशी फ्री स्टाईल लढाई होताना दिसते. त्यात दोन्ही बाजूंचे सैनिक अनेकदा जखमी होतात पण तरी कटाक्षाने गोळीबार केला जात नाही. गल्वान खोऱ्यात चीनी सैनिकांनी लोखंडी गज घेऊन भारतीय सैन्यावर हल्ला केला होता आणि असे हल्ले बहुदा बर्फ पडण्याच्या अगोदर किंवा हिमवृष्टी नंतर होतात. यंदा मात्र डिसेंबरच्या दुसर्या आठवड्याच्या सुरवातीलाच हा प्रकार घडला असून सुमारे ४५ मिनिटे ही हाणामारी सुरु होती.

दोन्ही सैन्यांकडून अश्या चकमकीत गोळीबार केला जात नाही कारण या सीमांवर सीज फायर लागू आहे. १९७५ नंतर कुणीच सिझ फायरचे उल्लंघन केलेले नाही. सीमेवर गोळीबार करायचा नाही अश्या कडक सूचना दोन्ही बाजूच्या सैनिकांना दिलेल्या आहेत. वरून आदेश आले तरच गोळीबार करायचा असून गेल्या ४० वर्षात अशी वेळ एकदाही आलेली नाही. दोन्ही देशांच्या सरकारांनी १९६७च्या आसपास याला संमती दिली दिली असून त्यानुसार कितीही वादविवाद, मतभेद, तणाव निर्माण झाला तरी फायरिंग करायचे नाही अन्यथा परिस्थिती बिघडेल. त्यामुळे जेव्हा जेव्हा चीनी सैनिक भारतीय हद्दीत घुसखोरी करू पाहतात तेव्हा तेव्हा केवळ धक्काबुक्की करून त्यांना पुन्हा वापस पिटाळले जाते.

२०१६ ते २०१८ या काळात चीनी सैनिकांनी १०२५ वेळा घुसखोरीचे प्रयत्न केले असून सिमेपल्याड चीनने रस्ते, पायाभूत सुविधा निर्माण करून गावे वसविली आहेत. या गावातून सैनिकच राहतात असे सांगितले जाते. भारतीय हद्दीत घुसून येथील सैनिकांना चिथावण्याचा प्रकार म्हणून याकडे पाहिले जाते.