भारत चीन एलएसी वर राफेल, सुखोई दाखविणार ताकद

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चीनी सैनिकात झालेल्या हाणामारी मुळे भारत चीन मधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर एलएसी म्हणजे प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारतीय हवाई दलाची अत्याधुनिक राफेल, सुखोई सह अन्य लढाऊ विमाने, चिनूक, अपाचे हेलिकॉप्टर्स त्यांची ताकद दाखवून देणार आहेत. १५ आणि १६ डिसेंबर रोजी भारतीय हवाई दलाची विमाने शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे वृत्त पीटीआय कडून दिले गेले आहे.

भारतीय हवाई दलाची क्षमता व एलएसी क्षेत्रात भारतीय सैन्याची तयारी पारखणे हा या युद्धाभ्यासाचा उद्देश आहे. अर्थात हा कार्यक्रम पूर्वीच निश्चित केला गेला होता आणि त्याचा भारत चीन यांच्यात तवांग येथे झालेल्या झटापटीशी संबंध नाही असे म्हटले जात आहे. भारतीय हवाई दलाचे सीमेवरील सर्व एअर बेस आणि काही अॅडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड वर हा सराव होणार आहे. भारतीय सेना आणि वायुदल अरुणाचल, आसाम, व सिक्कीम एलएसीवर लदाख विवाद झाल्यापासून दोन वर्षे उच्चस्तरीय संचालनात्मक तयारी ठेऊन आहे. गेल्या आठवड्यात एलएसी वर भारतीय हद्दीत हवाई दलाच्या विमानांनी गस्त घातली होती. चीन हद्दीत चीनी ड्रोन वरच्यावर दिसत असल्याने भारताने आपली लढाऊ विमानांची फौज आकाशात उतरवली होती.

१५ आणि १६ डिसेंबर रोजी होणारा हवाई सराव आसाम, अरुणाचल, प.बंगाल सहित उत्तरपूर्व राज्यांच्या हवाई हद्दीत केला जाणार आहे. यात मानवरहित युएव्ही सुद्धा सामील होणार आहेत.