पंतप्रधान जावई ऋषी सुनक बद्दल काय म्हणतात सासूबाई सुधा मूर्ती?

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सासर भारतात आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे सुनक जावई आहेत. सुधा मूर्ती लेखिका आणि सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. त्यांना एका कार्यक्रमात  तुमचे जावई ब्रिटनचे पहिले भारतवंशीय पंतप्रधान आहेत याविषयी तुम्हाला काय वाटते असे विचारले गेले. तेव्हा सुधा मूर्ती म्हणाल्या,’ मला त्याचा नक्कीच आनंद आहे.’

२४ ऑक्टोबरला सुनक कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते आणि २५ ऑक्टोबरला ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. त्याविषयी बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या, ऋषी पंतप्रधान बनले हे ठीक आहे. मला आनंद आहे पण त्यापेक्षा जास्त काही वाटत नाही. ब्रिटनला चांगला देश बनविण्यासाठी त्यांनी सर्वश्रेष्ठ योगदान द्यावे. राजकीय विषयांवर आम्ही कधीच चर्चा करत नाही. ते आमचे जावई आहेत, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

सुनक यांच्या विषयी येणाऱ्या बातम्या, त्यांची राजकीय प्रगती जाणण्याची उत्सुकता वाटते का याला उत्तर देताना मूर्ती म्हणाल्या, ‘मी माझ्या देशासाठी काम करते. इथल्या बातम्यात मला अधिक रस आहे. ते त्यांच्या देशासाठी काम करत आहेत. ९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापार्डे गावात सुधा मूर्ती यांनी दुर्गा मंदिरात पूजा केली आणि जावई सुनक यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर आला आहे. अन्य एका व्हिडीओ मध्ये विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना सुधा मूर्ती ‘माझ्या विषयी विचारा, सुनक यांच्या विषयी नको’ असे सांगताना दिसत आहेत.