‘ द वे ऑन वॉटर’-अवतार टू, रिलीजपूर्वी विकली गेली ४ लाख तिकिटे

आजपर्यंतचा सर्वाधिक खर्चिक चित्रपट ‘अवतार टू’ शुक्रवारी जगभरात ५२ हजार स्क्रीन आणि भारतात ३ हजार स्क्रीनवर रिलीज होत असून या चित्रपटाची सुमारे ४ लाख तिकिटे अॅडव्हांस बुकिंग मध्ये अगोदरच विकली गेली आहेत. यामुळे पहिल्याच दिवशी या चित्रपटची कमाई १४०० कोटींवर जाणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटांच्या इतिहासात हा सर्वात खर्चिक चित्रपट ठरला असून त्याचा खर्च सुमारे २ हजार कोटी आहे.

विशेष म्हणजे अवतार चित्रपटाची कथा एका स्वप्नातून सुरु झाली. लेखक, दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांची आई शर्ली हिला फार पूर्वी एक स्वप्न पडले आणि त्यात निळ्या रंगाची १२ फुट उंचीची मुलगी तिने पाहिली. यावरून प्रेरणा घेऊन कॅमेरून यांनी एका ग्रहावर निळ्या रंगाचे आणि १० ते १२ फुट उंचीचे लोक आहेत अशी कल्पना केली आणि त्यातून या चित्रपटांचे कथानक तयार झाले. वास्तविक टायटॅनिक या अत्यंत गाजलेल्या चित्रपटाच्या पूर्वीच हे कथानक कॅमेरून यांना सुचले होते मात्र प्रत्यक्ष अवतार निर्मिती टायटॅनिक तयार झाल्यावर १२ वर्षांनी केली गेली आणि आता त्याचा दुसरा भाग त्यानंतर १३ वर्षांनी आला आहे.

२००९ मध्ये आलेल्या अवतारने उत्पन्नाचे सर्व रेकॉर्डस तोडले होते. पहिल्या अवतारची कथा कॅमेरून यांना १९९४ मध्ये सुचली होती पण प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती २००६ मध्ये सुरु झाली होती. कॅमेरून यांच्या टायटॅनिकची कमाई १८.१९ हजार कोटी होती तर अवतारची २४ हजार कोटी.

अवतार चित्रपटाचे पाच भाग तयार केले जाणार आहेत. पैकी पहिला २००९ मध्ये रिलीज झाला होता तर दुसरा १६ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज होत आहे. तिसरा भाग  २० डिसेंबर २०२४ मध्ये, अवतार चार १८ डिसेंबर २०२६ मध्ये तर अवतार पाच २२ डिसेंबर २०२८ मध्ये येणार आहे.