फिफा वर्ल्ड कप, मेस्सीचे नवे रेकॉर्ड

कतार येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ च्या उपांत्य सामन्यात भिडलेल्या आर्जेन्टिना आणि क्रोएशिया या दोन बलाढ्य संघात आर्जेन्टिनाने क्रोएशियाला ३-० अशी मात देऊन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याच वेळी आर्जेन्टिनाचा कप्तान लियोनेल मेस्सी याने हा सामना खेळण्यासाठी मैदानावर पाउल टाकताच आणखी एका रेकॉर्डची नोंद स्वतःच्या नावावर केली आहे. फिफा वर्ल्ड कप मधला मेस्सीचा हा २५ वा सामना होता आणि त्याने फिफा वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक सामने म्हणजे २५ सामने खेळलेल्या जर्मनीच्या माजी फुटबॉलपटू लोथर मथौस यांची बरोबरी केली आहे.

लोथरने १९८२ मध्ये फिफा डेब्यू केला होता आणि १९८८ ला तो शेवटचा फिफा वर्ल्ड कप खेळला. जर्मनीच्याच मिरोस्लाब क्लोज याच्या नावावर २४, इटलीच्या पालाओ माल्दिनी यांच्या नावावर २३ तर पोर्तुगालच्या रोनाल्डोच्या नावावर २२ फिफा वर्ल्ड कप सामने खेळल्याची नोंद आहे. मेस्सीने २००६ मध्ये आर्जेन्टिनातर्फे पहिला फिफा वर्ल्ड कप सामना सर्बिया व मोन्तेनेओ विरुद्ध खेळला होता. त्यावेळी सब्स्टीट्युट म्हणून मैदानावर आलेल्या मेस्सीने ८८ व्या मिनिटाला गोल केला होता. त्यानंतर मेस्सी सातत्याने वर्ल्ड कप सामने खेळत आला आहे.

२०१४ फिफा वर्ल्ड कप अंतिम फेरीत आर्जेन्टिनाला १-० अशी हार पत्करावी लागली होती. मात्र त्यावेळी मेस्सीने उत्तम कामगिरी बजावल्याने त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडले गेले होते.