काशी विश्वनाथ धामला वर्षात साडेसात कोटी भाविकांची भेट

वाराणसी मधील काशी विश्वेश्वर धामचे लोकार्पण करून १३ डिसेंबर रोजी वर्ष झाले असताना या वर्षात येथे सुमारे साडेसात कोटी भाविकांनी भेट दिली आणि विश्वनाथ धामच्या इतिहासात या वर्षात दान मिळण्याचे रेकॉर्ड मोडले गेल्याचे समजते. धाम प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार देश विदेशातील भाविक मोठ्या संख्येने या वर्षात नव्या धाम दर्शनासाठी आले आणि सोने, चांदी अन्य धातू तसेच सुमारे ५० कोटींचे रोख दान येथे दिले गेले आहे. रोकड दानातील ४० टक्के दान ऑनलाईन सुविधेतून प्राप्त झाले असून ६० किलो सोने, १० किलो चांदी आणि १५०० किलो तांबे दान म्हणून मिळाले. त्याचा वापर मंदिरातील दरवाजे, गर्भगृह भिंती आणि अन्य ठिकाणी केला गेला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५०० पटीने अधिक भाविक येथे आले. विश्वनाथ धाम परिसरातील चार द्वारांवर हेड स्कॅनिंग मशीन लावली गेली असून त्याच्या मदतीने नियमित काळानंतर भाविकांची गणना केली जाते. या कॉरिडोरच्या उभारणीसाठी ९०० कोटी रुपये खर्च आला आहे. पण भक्त संख्या वाढत असून येत्या चार पाच वर्षात आणखी काही भक्ती निवास उभारले जाणार आहेत. त्यातून सुद्धा धाम प्रशासनाला उत्पन्न मिळत आहे. येथे पाणी, सावली, व्हील चेअर्स, साफसफाई, लॉकर, हेल्प डेस्क अश्या अनेक सुविधा पुरविल्या जात असून त्यासाठी सुमारे ४०० कर्मचारी नेमले गेले आहेत.

विश्वनाथ धाम खुला झाल्यापासून भाविक संख्या वाढते आहे यामुळे हॉटेल्स, वाहतूकदार, कामगार, वस्त्रोद्योग, हस्तकला या उद्योगांच्या व्यवसाय आणि कमाईमध्ये सुद्धा वाढ झाल्याचे समजते.