सौदीत उभारली जातेय बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत आणि सर्वात मोठा विमानतळ

शेजारी राष्ट्र संयुक्त अरब अमिरातीला मागे टाकून सौदी अरेबिया त्यांच्या व्हिजन २०३० योजनेवर वेगाने काम करत असून दुबईच्या जगातील सर्वात उंच, बुर्ज खलिफाच्या दुप्पट उंचीची इमारत सौदीची राजधानी रियाध येथे उभारली जाणार आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठा विमानतळ सुद्धा येथे बांधला जात असून हा विमानतळ ५७ किमी परिसरात असेल असे समजते. येथे सहा रन वे एकापाठोपाठ असतील आणि त्यांची प्रवासी क्षमता १२ कोटी असेल असे समजते.

सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन २०२३ योजना आखली आहे. त्यानुसार रियाध येथे २००० मीटर उंचीची म्हणजे २ किलोमीटर उंचीची महाप्रचंड इमारत उभारली जाणार असून त्यासाठी ५ अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. या इमारतीची लांबी वर्ल्ड ट्रेड सेंटरपेक्षा चौपट असेल आणि बिग बेन पेक्षा ही इमारत २० पट उंच असेल.

टॉल बिल्डींग्स अँड अर्बन हॅबीटेट कौन्सिल नुसार ३०० मीटर उंचीच्या इमारतीला सुपर टॉल, ६०० मीटर पेक्षा उंच इमारतीला मेगा टॉल म्हटले जाते. जगात १७३ सुपरटॉल तर फक्त चार मेगाटॉल इमारती आहेत. त्यात दुबईची बुर्ज खलिफा, क्वालालंपूरचे मर्डेका, शांघाई टॉवर आणि मक्केच्या मक्का रॉयल क्लॉक टॉवरचा समावेश आहे.

प्रिन्स मोहमम्द बिन सलमान यांनी शेजारी युएईला मागे टाकण्याची योजना बनविली असून जगातील सर्वात उंच इमारत बनविण्याचे डिझाईन करण्यासाठी आठ कंपन्यांना निमंत्रित केले आहे. सौदी मध्ये ५०० मीटर उंचीचे एक हॉटेल सुद्धा उभारले जाणार असल्याचे समजते. या मुळे येथे पर्यटन उद्योग व अन्य उद्योग विकसित होणार असून देशाच्या महसुलात वाढ होईल असे म्हटले जात आहे.