वर्ल्ड कप फायनलनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार मेस्सी


अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने 2022 च्या फिफा विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मेस्सी आपल्या देशाकडून शेवटच्या वेळी खेळताना दिसणार आहे. या सामन्यात आपल्या संघाला चॅम्पियन बनवून विश्वचषक जिंकून गोल्डन बूट आपल्या नावावर करण्याची संधी मेस्सीकडे आहे. तसेच मेस्सी रोनाल्डोचा विक्रम मोडू शकतो.

18 डिसेंबर रोजी फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीनंतर निवृत्त होणार असल्याची पुष्टी खुद्द लिओनेल मेस्सीने केली आहे. क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने पेनल्टीवर गोल करत आपल्या संघाला अंतिम फेरी गाठण्यास मदत केली. त्याच्याशिवाय, ज्युलियन अल्वारेझने दोन उत्कृष्ट गोल केल्यामुळे अर्जेंटिनाने क्रोएशियाचा ३-० असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. यानंतर मेस्सीने अंतिम फेरीत आपल्या देशाकडून खेळणार असल्याचे स्पष्ट केले.

३५ वर्षीय मेस्सी आपला पाचवा विश्वचषक खेळत आहे. त्याने चार विश्वचषक खेळलेल्या अर्जेंटिनाच्या दिएगो मॅराडोना आणि जेवियर मास्चेरानोला मागे टाकले आहे. मेस्सीने कतार विश्वचषकात त्याचा पाचवा गोल नोंदवत विश्वचषकातील गोल करण्याच्या विक्रमात गॅब्रिएल बतिस्तुताला मागे टाकले. गॅब्रिएल बतिस्तुताने वर्ल्ड कपमध्ये 11 गोल केले असून मेस्सीने त्याला मागे टाकले आहे.