डिसेंबरच्या रात्री घ्या उल्का वर्षावाचे नयनसुख
खगोल प्रेमी मंडळींसाठी नयनसुख देणारा महिना म्हणजे डिसेंबर. वर्षाच्या शेवटच्या या महिन्यात नाताळ येतो म्हणून जगभर सेलेब्रेशन होतात तर याच महिन्यात खगोल प्रेमी किंवा आकाश निरीक्षक उल्का वर्षावाचा आनंद डोळे भरून लुटत असतात. सध्या १५ दिवस उल्का वर्षावाचा हा आनंद घेता येणार असून १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री या वर्षातील सर्वाधिक उल्का पडताना दिसणार आहेत. अर्थात अर्ध्या रात्री चंद्रप्रकाशामुळे उल्का फार प्रकाशमान दिसत नाहीत. पण मिथुन राशीतून होणारा उल्कावर्षाव स्पष्ट दिसणार आहे.
उल्का म्हणजे धूमकेतूचे छोटे तुकडे आणि अंतराळातील मलव्याचे तुकडे मानले जातात. पृथ्वी जेव्हा सूर्याच्या जवळून जाते तेव्हा दरवर्षी डिसेंबर मध्ये या उल्का मोठ्या प्रमाणावर दिसतात. अंतराळात धूळ, छोटे तुकडे, खडक यांची एका दाट नदी तयार झालेली असून या दाट भागातून जेव्हा पृथ्वी प्रवास करते तेव्हा हे तुकडे पुथ्वीच्या वातावरणात शिरताच जळतात त्यालाच उल्का म्हटले जाते.
१४ डिसेंबरला होणारा उल्कावर्षाव नीट पाहायचा असेल तर चन्द्रोदयापूर्वी शहरापासून दूर अंधाऱ्या जागी गेल्यास त्याचा आनंद घेता येणार आहे.