मेस्सीशी वाद घालणाऱ्या रेफ्री लाहोझ यांची हकालपट्टी

कतार येथे सुरु असलेली फिफा वर्ल्ड कप २०२२ स्पर्धा आता उपांत्य फेरीत पोहोचली असून मंगळवारी आर्जेन्टिना आणि क्रोएशिया यांच्यातील पहिला उपांत्य सामना होत आहे. मात्र त्यापूर्वीच वाद निर्माण झाला असून आर्जेन्टिनाचा कप्तान लियोनेल मेस्सी यांच्या तक्रारीनंतर रेफ्री माटेय लाहोझ यांच्या संदर्भात फिफाने मोठा निर्णय घेतला आहे. फिफाने लाहोझ यांना स्पर्धेबाहेर केले असून यापुढे एकही सामन्यात त्यांना रेफ्री म्हणून काम करता येणार नाही. लाहोझ यांना त्याच्या मायदेशी म्हणजे स्पेनला परत जाण्यास सांगितले गेल्याचे समजते. मात्र या स्पर्धेत रेफ्री म्हणून काम करत असलेले स्पेनचे अन्य तीन रेफ्री कायम राहणार आहेत.

उपांत्यपूर्व सामन्यात आर्जेन्टिना आणि नेदरलंडमध्ये चुरशीचा सामना झाला त्यावेळी लाहोझ रेफ्री म्हणून काम करत होते. मेस्सी सह अनेक खेळाडूंबरोबर त्यांचे वाद झाले. त्यांनी एक दोन नाही तर तब्बल १५ वेळा यलो कार्ड आणि एकदा रेड कार्ड वापरले. लाहोझ यांचे काही निर्णय इतके वादग्रस्त होते कि मैदानावरच हाणामारीची वेळ आली होती. यावरून खेळाडू, फिफा स्टाफ आणि प्रेक्षकांनी टीकेची झोड उठविली होती.

त्यानंतर फिफाने लाहोझ यांना पुढच्या कुठल्याच सामन्यात तुम्हाला रेफ्री म्हणून काम करता येणार नाही असे कळवून त्यांची मायदेशी रवानगी केली. याविषयी बोलताना मेस्सी म्हणाला, मी लाहोझ यांच्या विषयी काहीच बोलणार नाही अन्यथा आम्हाला दंड होईल. पण जे घडत होते त्याला प्रेक्षक साक्ष आहेत. वारंवार यलो कार्ड दाखवून खेळाडूंची लय बिघडवली जात होती. फिफाने या बाबतीत खबरदारी घेतली पाहिजे.