काय आहे चीन भारत सीमेवरची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा?’

लदाख जवळच्या गलवान घाटीत उडालेल्या चकमकी नंतर पुन्हा एकदा चीनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशातील तवांग भागातील एलएसी म्हणजे वास्तविक (प्रत्यक्ष) नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडल्याच्या बातम्या आल्या आहेत. यानंतर पुन्हा एकदा एलएसी चर्चेत आली आहे. ही एलएसी किंवा वास्तविक नियंत्रण रेषा म्हणजे नक्की काय आहे याची माहिती खास आमच्या वाचकांसाठी .

एलएसी म्हणजे ही वास्तविक नियंत्रण रेषा सध्याची दोन्ही देशाची सीमा स्थिती दर्शविणारी असली तरी दोन्ही देशांनी त्याला मान्यता दिलेली नाही. त्यासंदर्भात असलेला वाद सुटेपर्यंत ही सीमा रेषा मान्य केली गेली आहे. त्यात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशातील जमिनीचा भाग येतो. त्याची सुरवात भारताच्या अधिकृत भागातून होते व चीनला अधिकृत अक्साई चीन पासून वेगळे करणाऱ्या भागापर्यंत ती जाते. १९४८ च्या भारत पाकिस्तान पहिल्या युद्धात पाकने अधिकृत काश्मीर चा हिस्सा घेतला तो नंतर चीनने पाकिस्तान कडून हस्तगत केला.

एलएई ही ४०५७ किमीची सीमा लदाख, काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश भागातून जाते. ही हद्द कुठल्याही देशाने ओलांडली तर ते सीमारेषेचे उल्लंघन मानले जाते. भारताला लदाख आणि अक्साई चीनचा मोठा भाग परत हवा आहे पण चीन ही रेषा वारंवार उल्लंघन करते त्यामुळे सतत वाद होत असतात. एलएसी मॅकमोहन रेषेवर आधारित आहे. १९१४ मध्ये भारताचे विदेश सचिव हेनरी मॅकमोहन आणि तिबेट प्रतिनिधी यांच्यात सिमला तह झाला तेव्हा दोन्ही देशांनी सीमा रेषा निश्चित केली होती. पण नंतर चीनने तिबेट ताब्यात घेतले आणि मॅकमोहन रेषा मानण्यास नकार दिला तसेच लदाखचा बराचसा भाग ताब्यात घेतला. डोक्लाम, लदाख, गल्वान या भागात चीन वारंवार घुसखोरी करतो आहे आणि त्यामुळे या सीमेवर भारताने सैन्याची ताकद वाढविली आहे.