ट्विटर मुख्यालयातील सामान मस्क यांनी काढले लिलावात

सॅन फ्रान्सिस्को येथील ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या मुख्यालयातील बरेचसे सामान नवे मालक एलोन मस्क यांनी लिलावात काढले असून त्या विक्रीतून ट्विटरचे नुकसान कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. एकूण २६५ वस्तू लिलावात काढल्या गेल्या आहेत. त्यात किचन मध्ये वापरले जाणारे सामान, कॉफी मशीन, ओव्हन, फ्रीझर, बर्फ मशीन, फ्रायर पासून इलेक्ट्रोनिक वस्तू, खुर्च्या असे अनेक प्रकारचे सामान आहे.

ऑनलाईन साईट बीड स्पॉटरवर १७ आणि १८ जानेवारीला हा लिलाव होणार आहे. पेमेंट फक्त वायर ट्रान्स्फरने ग्राहक करू शकतील आणि लिलाव संपल्याबरोबर ४८ तासात खरेदी केलेल्या वस्तूंचे पैसे जमा करावे लागणार आहेत. या वस्तू २५ डॉलर्स म्हणजे २ हजार रुपयांपासून विक्रीसाठी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एलोन मस्क यांनी ट्विटर ४४ अब्ज डॉलर्स मोजून टेकओव्हर केले तेव्हापासून रोज ३२ कोटींचे नुकसान होत आहे. हजारो कर्मचार्यांना मस्क यांनी कामावरून काढून टाकले असून कंपनीत फ्री लंच सेवा बंद केली आहे. उत्पन्नासाठी कंपनी प्रामुख्याने जाहिरात महसूल वाढविण्यावर भर देत आहेच पण ब्लू टिक साठी पैसे आकारून त्यातूनही महसूल वाढविला जात आहे. कंपनीतील सामान विकून सुद्धा काही भरपाई केली जाणार आहे असे म्हटले जात आहे.