टोल प्लाझा, फास्टॅग जाणार, टोल गोळा करणार कॅमेरे

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने आता टोल गोळा करण्यासाठी नवी योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टोल नाके आणि फास्टॅग  यापुढे दिसणार नाहीत असे सांगितले जात आहे. कर गोळा करण्याचे काम नवीन योजनेनुसार कॅमेरे करणार आहेत. गाडीची नंबरप्लेट हे कॅमेरे स्कॅन करतील आणि त्यावरून वाहन मालकाच्या बँक खात्यातून थेट टोल रक्कम कापून घेतली जाईल. यामुळे टोल गोळा करण्याची प्रोसेस अधिक पारदर्शक होईलच पण वाहनचालकांना रस्त्यात कुठेही न थांबता टोल भरता येणार आहे.

देशात हायवे आणि एक्स्प्रेसवे चे जाळे मोठ्या प्रमाणावर विकसित केले जात आहे आणि जे रस्ते प्रवासासाठी तयार झाले आहेत यावर टोलनाके उभे राहिले आहेत. दाट लोकवस्ती किंवा मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या रस्त्यांवर टोल नाक्यासमोर वाहनांच्या लांब रांगा हे नेहमीच दृश्य आता फास्टॅग मुळे थोड्याफार प्रमाणात दिसत असले तरी काही अतिवर्दळीच्या हायवेजवर फास्टॅग सेवा असूनही वाहनाच्या रांगा दिसतात. यामुळे नवी सिस्टीम अमलात आणण्याचा विचार गेले काही दिवस केला जात होता.

याला कॅमेरा बेस्ड टोल सिस्टीम असे म्हटले जात आहे. अर्थात त्यासाठी गाडीच्या नंबरप्लेट बदलाव्या लागणार आहेत. जे कॅमेरे हे काम करतात त्यांना ऑटो नंबर प्लेट रीडर असे म्हटले जाते. २०१८-१९ मध्ये टोल नाक्यावर प्रतीक्षा करावी लागण्याचा सरासरी वेळ आठ मिनिटे होता. फास्टॅग सेवा सुरु झाल्यावर हा वेळ ४७ सेकंदावर आला तरी शहरी भागात जाण्यासाठी असलेली गर्दी पाहता अनेकदा हा वेळ वाढतो असे दिसून येत आहे. नव्या सिस्टीममुळे लोकांना पिक अवर्स मध्ये सुद्धा रस्त्यात कुठेही थांबावे लागणार नाही असा दावा केला जात आहे.