‘ईडीचे आठ वर्षात तीन हजार छापे आणि केवळ तेवीस जणांवर आरोप सिद्ध’-आप चा आरोप


नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांनी गेल्या आठ वर्षांत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सुमारे ३ हजार छापे टाकले. त्यापैकी केवळ २३ जणांना दोषी ठरवण्यात ईडीला यश आले. छापे आणि प्रत्यक्ष दोषी यांचे हे प्रमाण केवळ ०. ५ टक्के एवढे आहे, अशा शब्दात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सरकारचे वाभाडे काढले. हिवाळी अधिवेशनात राज्यसभेच्या कामकाजात शून्य प्रहरात त्यांनी सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. दिल्ली महापालिका निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रलोभने दाखवून गळाला लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही ‘आप’ने केला.

तपास यंत्रणांचा गैरवापर या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ झाला. खासदार संजय सिंह यांनी सरकारच्या चारित्र्यावरच प्रश्न उपस्थित केला. विरोधकांना बाहेर बोलू दिले जात नाही आणि संसदेतही या विषयावर बोलण्याची परवानगी नाही अशी टीकाही त्यांनी केली.

फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी, फरारी मद्यविक्रेते विजय मल्ल्या, माजी क्रिकेट प्रशासक आणि आयपीएल संस्थापक ललित मोदी यांच्याबाबत सरकार गप्प का, असा सवालही सिंह यांनी केला. तब्बल २० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीविरुद्ध ईडी कारवाई का करत नाही? नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, रेड्डी बंधू, येडियुरप्पा आणि व्यापम घोटाळ्यातील दरोडेखोर यांची ईडी आणि सीबीआय का चौकशी करत नाही? सत्ताधारी पक्षाशी संबंधित सर्व भ्रष्ट लोकांवर कारवाई का केली जात नाही; अशा सवालांची सरबत्ती संजय सिंह यांनी केली.

संजय सिंह पुढे म्हणाले की, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर तब्बल १४ तास छापे टाकण्यात आले. अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आणि सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. सभागृहात संजय सिंह यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईचाही उल्लेख केला.भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून अन्य पक्षांचे राज्य असलेली सरकारे अस्थिर करण्याच्या दिशेने काम करत आहे. आमदारांना प्रलोभने आणि धमक्या देऊन फिरविण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला.