नाताळच्या दिवसात ब्रिटन मध्ये ऐतिहासिक संप, सुनक यांच्यापुढे मोठे आव्हान

ब्रिटन मध्ये ऐन नाताळच्या दिवसात गेल्या ३० वर्षातील सर्वात मोठा हरताळ सुरु झाला असून त्यात बस, रेल्वे, विमानसेवा, नर्सिंग, पोस्टल स्टाफ अश्या अनेक विभागातील २ लाखाहून अधिक कर्मचारी सामील झाले आहेत. त्यामुळे नाताळ साठी येणारे पर्यटक, प्रवासी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ब्रिटन मध्ये नाताळ सुट्टीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. एरवी नाताळसाठी सजावटीने नटलेल्या रस्यांवर यंदा संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांची गर्दी, घोषणाचे आवाज दुमदुमत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक विभागातले कर्मचारी वेगवेगळ्या मागण्या साठी संपावर आहेत मात्र त्या सर्वाची एक मागणी कॉमन आहे आणि ती मागणी आहे पगारवाढ. या सर्व परिस्थितीमुळे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले असून त्यांची लोकप्रियता वेगाने घसरू लागली आहे.

ज्या वेगाने महागाई वाढली आहे त्या वेगाने पगार वाढलेले नाहीत. ब्रिटन मध्ये महागाई दर ११.१ टक्के आहे. नर्सिंग स्टाफला ४.७५ टक्के, अँब्लूलंस स्टाफला ४ टक्के, पोस्ट विभाग ९ टक्के पगारवाढ दिली गेली असून ही पगारवाढ त्यांनी फेटाळली आहे. या संपाची सुरवात ७ डिसेंबर पासून झाली असून शिक्षकांनी काम बंद करून सुरवात केली आहे. त्यांची मागणी पगार वाढवा, पेन्शन वाढवा अशी आहे. २३ ते २६ व २९ ते ३१ डिसेंबर या काळात एअर पोर्ट स्टाफ संपावर जाणार आहे. या आठ दिवसात गैरसोय होऊ नये म्हणून सेना तैनात केली जाणार असल्याचे समजते.

४० हजार रेल्वे कर्मचारी १३ ते १७ डिसेंबर काम बंद ठेवणार असून त्यामुळे ५० टक्के सेवा बाधित होणार आहे. १५ ते २० डिसेंबर १ लाख नर्स संपावर जाणार आहेत. तसेच १० हजार अँब्लूलंस कर्मचारी २१ व २८ डिसेंबर असे दोन दिवस काम बंद ठेवणार आहेत. यापूर्वी १९८९ म्हणजे ३० वर्षापूर्वी असा मोठा संप झाला होता. संपकऱ्यानी पंतप्रधान सुनक यांना पगार कमी आहेत मग वाढविलेला कर द्यायचा कसा असा सवाल केला असून कर वाढविले गेले ते योग्य आहेत असे सुनक यांचे म्हणणे आहे.