अंधविश्वास तोडून हिमाचलला मिळाला पहिला मिशीवाला मुख्यमंत्री

हिमाचल प्रदेशला प्रथमच भरदार मिशा असलेले मुख्यमंत्री मिळाले आहेत. सिमला येथील ऐतिहासिक रिज मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात सुखविंदरसिंग सुख्कू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन हिमाचल मध्ये मिशा असलेल्या मुख्यमंत्री बनू शकत नाही हा अंधविश्वास तोडून टाकला आहे. सुख्कू यांच्यापूर्वी हिमाचल ला सहा मुख्यमंत्री मिळाले आहेत मात्र त्यातील कुणालाच मिशा नव्हत्या.

२५ जानेवारी १९५१ मध्ये हिमाचलला राज्याचा दर्जा मिळाला आणि १९५२ मध्ये यशवंत सिंग परमार मुख्यमंत्री झाले. ते दोन वेळा मुख्यमंत्री होते तसेच ठाकूर रामलाल, बीजेपी शांताकुमार, प्रेमकुमार धुमल, दोन वेळा मुख्यमंत्री होते. जयराम ठाकूर एक वेळा तर दिवंगत वीरभद्रसिंग सहा वेळा हिमाचलचे मुख्यमंत्री होते. ७० वर्षात या राज्याला कधीच मिशी ठेवलेला मुख्यमंत्री मिळाला नाही. जयराम ठाकूर यांना छोट्या मिशा होत्या पण मुख्यमंत्री होण्या अगोदर त्यांनी मिशा काढून टाकल्या होत्या असे सांगतात.

सुखविंदर सिंग यांनी सिमला कॉलेज मध्ये क्लास प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढविण्याची सुरवात केली होती. ते युथ कॉंग्रेस आणि नंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे आणि ते चौथ्या वेळी आमदार बनले आहेत. त्यांच्या शपथविधीला राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.