लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन


मुंबई: आपल्या घरंदाज लावणीने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. मराठीसह हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये सुलोचना चव्हाण यांनी पार्श्वगायन केले आहे.

संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कदम कुटुंबात 13 मार्च 1933 रोजी सुलोचनाबाईंचा जन्म झाला. त्यांचे बालपण ठाकूरद्वारच्या फणसवाडी येथे चाळ संस्कृतीमध्ये गेले. त्यांना लहानपणापासूनच गायनाची मोठी आवड होती. गायनाचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसले तरीही रेडिओ आणि ग्रामोफोनवरील रेकॉर्ड्स ऐकून त्यांनी गाणे आत्मसात केले.

हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. सुलोचनाबाईंनी 1946- 47 पासून हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायनाला सुरुवात केली. कृष्ण सुदामा या चित्रपटात संगीतकार शाम भट्टाचार्य यांच्याकडे त्यांनी पहिले गाणे गायले त्यानंतर भगवान दादा यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले.

मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त अशा त्या काळातील आघाडीच्या गायकांबरोबर पार्श्वगायनाची संधी सुलोचनाबाईंना लाभली. हिंदी, मराठीसह गुजराती, तमिळ, पंजाबी या भाषांमध्येही त्यांनी विशेषतः भजन आणि गझलगायन केले. सुलोचनाबाईंच्या गझलगायनाचे विख्यात गायिका बेगम अख्तर यांनी तोंड भरून कौतुक केले. वसंत देसाई यांच्या संगीत दिग्दर्शनात ही माझी लक्ष्मी या मराठी चित्रपटातून त्यांनी मराठी पार्श्वगायनात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी गायलेली लावणी अभिनेत्री हंसा वाडकर यांच्यावर चित्रित करण्यात आली. यानंतर अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी लावणी हा गायन प्रकार सादर केला. लावणीला घरंदाजपणा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे श्रेय सुलोचनाबाईंना दिले जाते.

पती वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर दुःखाच्या धक्क्याने काही काळ सुलोचना बाईंचा आवाज गेला. मात्र, त्यातून सावरत त्यांनी आपले गाणे टिकवून ठेवले. त्यानंतरच त्यांनी, पाडाला पिकलाय आंबा, कळीदार कपूरी पान अशा गाजलेल्या लावण्या सादर केल्या.

संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री या सन्माननीय नागरी पुरस्कारासह अनेक शासकीय आणि सांस्कृतिक संस्थांनी विविध पुरस्कार देऊन सुलोचनाबाईंचा यथोचित गौरव केला.