ट्विटर मुख्यालयात मस्क यांनी तयार केल्या बेडरूम्स

ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयात कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी चक्क बेडरूम्स तयार केल्याचे फोटो सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाले आहेत. ट्विटर ताब्यात येताच मस्क यांनी निम्म्या कर्मचारी वर्गाची हकालपट्टी केली आहे आणि वर्क फॉर्म होम करणाऱ्याना ऑफिस मध्ये येण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय चोवीस तास काम करण्याची तयारी ठेवा असेही त्यांनी कर्मचाऱ्यांना बजावले आहे. कंपनी मुख्यालयात काही भागात बेडरूम तयार केल्या गेल्या असल्याची दखल सॅन फ्रान्सिस्को डिपार्टमेंट ऑफ बिल्डींग इन्स्पेक्शन विभागाने घेतली आहे. ही इमारत रहिवासी नाही तर व्यावसायिक वापरासाठी नोंदली गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मस्क यांची कृती नियमबाह्य ठरू शकेल असे म्हटले जात आहे.

बीबीसीने या संदर्भातले फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत बेड, चादरी, उश्या, सोफे दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत सिंगल बेड, वॉर्ड रोब, वॉशिंग मशीन, छोटी बाथरूम दिसत आहे. फोर्ब्सने दिलेल्या बातमीनुसार या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चार ते आठ बेडरूम्स केल्या गेल्या असून पडदे, टेलीप्रिंटर्स, मॉनिटर्स, रग, बेडसाईड टेबल्स, खुर्च्या दिसत आहेत. ऑफिस मध्ये सातत्याने काम करता यावे आणि विश्रांती साठी सुद्धा घरी जावे लागू नये म्हणून ही व्यवस्था केली असल्याचे सांगितले जात आहे.