गुजराथ या कारणांनी सुद्धा आहे प्रसिद्ध

स्वादिष्ट भोजन, उपहाराचे नाना प्रकार, पतंग महोत्सव, दांडिया, रास गरबा, लोकप्रिय पर्यटन राज्य अश्या अनेक कारणांनी गुजराथ राज्य चर्चेत असते. पण या शिवाय अन्य अनेक खास कारणे सुद्धा गुजराथला हटके राज्य बनविण्यासाठी कारणीभूत आहेत ज्याची फारशी माहिती सामान्य नागरिकांना नाही.

गुजराथ देशाचे प्रमुख व्यापार केंद्र आहेच पण या राज्यात तब्बल १४ विमानतळ आहेत. अनेक मोठ्या राज्याचे रेकॉर्ड गुजराथने याबाबतीत मागे टाकले आहे. या राज्यात सर्वाधिक डेअरी उत्पादन होते आणि अमूल ब्रांड ने देश विदेशात ग्राहकांची पसंती मिळविली आहे.

अहमदाबाद पासून २३ किमीवर असलेले गांधीनगर आशियाची ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते. येथील ५० टक्के भूमी हिरवळीने व्यापलेली आहे. त्यामुळे येथील हवा शुद्ध आहे. गुजराथ सुरक्षित राज्य म्हणून ओळखले जाते. एकट्या दुकट्या महिला पर्यटक सुद्धा येथे बिनधास्त फिरू शकतात. सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत गुजराथच्या सुरत शहराचा समावेश असून ही देशाची हिरे नगरी म्हणून ओळखली जाते. चेन्नई, बंगलोरला मागे टाकून सुरतने श्रीमंत शहराच्या यादीत आपली जागा मिळविली आहे. येथे देशातील ८० टक्के हिरे रिफाईन केले जातात.

गुजराथ हे साखरेचा सर्वाधिक खप होणारे राज्य आहे. तसेच शाकाहारी लोकांची संख्या येथे फार मोठी आहे. त्यामुळे विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, फूड मॉल मधून शाकाहारी पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात. या राज्यात दारू बंदी आहे त्यामुळे दारूची दुकाने नाहीत.