आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला अधिकृत राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली असून त्यामुळे दिल्लीत केंद्र सरकार कडून कार्यालयासाठी हक्काची जागा मिळविता येणार आहे. दिल्लीत याच पक्षाचे सरकार आहे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यालय दिनदयाळ उपाध्याय मार्गावर आहे. पण ही जागा दिल्ली सरकारकडून मिळालेली आहे. राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला नियमानुसार सरकारी निवासस्थान द्यावे लागते पण अध्यक्ष अगोदरच सरकारी निवासस्थानात राहत असेल तर दुसरे निवासस्थान दिले जात नाही. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल अगोदरच सिव्हील लाईन्स मधील अलिशान बंगल्यात राहत आहेत त्यामुळे त्यांना दुसरे निवासस्थान दिले जाणार नाही असे समजते.

गुजराथ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला १२.९२ टक्के मते आणि ५ जागा मिळाल्या आहेत. या पक्षाचे पंजाब आणि दिल्ली मध्ये सरकार आहे. शिवाय गोवा राज्यात त्यांना प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. प्रादेशिक पक्ष होण्यासही राज्यात किमान ८ टक्के मते संबंधित पक्षाला मिळवावी लागतात. चार राज्यात पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असल्याने त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नियमानुसार दिला गेला आहे. हा दर्जा निवडणूक आयोगाकडून दिला जातो.

चार राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता, तीन विविध राज्यात लोकसभा निवडणुकीत किमान २ टक्के मते म्हणजे किमान ११ जागा किंवा विधानसभा निवडणुकीत चार राज्यात ६ टक्के मते यापैकी कोणतीही अट पूर्ण करणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाकडून दिला जातो.